Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रविण तरडे आणि राकेश बापट यांनी साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 11:04 IST

दोघांनीही अतिशय सुरेख अशी मूर्ती शाडूच्या माती पासून साकारली असून ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.

बॉलीवूड अभिनेता राकेश बापटगणेशोत्सवानिमित्त श्री गणरायांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी स्वतः मूर्ती साकारतो. सालाबादप्रमाणे यंदाही त्याने श्रींची मूर्ती साकारली असून यावर्षी त्याला लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रविण तरडेची साथ लाभली आहे. दोघांनीही अतिशय सुरेख अशी मूर्ती शाडूच्या माती पासून साकारली असून ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.

 

 

राकेश बापट म्हणाला, मूर्ती साकारण्यासाठी आठ दिवस लागतात, या कामात मला कधीही कंटाळा येत नाही. मला यातून सकारात्मक उर्जा मिळते, नकारात्मक विचार निघून जातात. या काळात मी एकटा असतो यामुळे विचार करायला वेळ मिळतो, इतर वेळी असा एकांत मिळत नाही. गणेशोत्सव मला नेहमी उत्साह देऊन जातो.

प्रविण तरडेने सांगितले की, मला लहानपणापासून गणपतीची मूर्ती साकारायची होती मात्र कधीच जमले नाही, यंदा राकेशमुळे तो योग जुळून आला. या शिल्पकलेत मी पूर्ण तल्लीन झालो होतो, चित्रपट कलाकृती ही आपली निर्मिती असते यामुळे यात आपल्यापेक्षा काहीच मोठे नाही असे वाटते, मात्र ही मूर्ती साकारताना समजले की कलाकृती पेक्षा आपण कधीच मोठे होऊ शकत नाही. दरम्यान महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचे संकट नेहमी येते यंदाही काही भागावर आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे संकट आले होते, असे कोणतेच नैसर्गिक संकट पुन्हा येऊ नये असे साकडे गणरायाला घातल्याचे सांगितले.

प्रविण तरडेने  पहिल्यांदाच बाप्पांची मूर्ती साकारली आहे, या नवनिर्मितीबरोबर इतर नवीन काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की,  हा बाप्पा आकार घेत होता तेव्हा आमच्या मनातही नव्हते की मी आणि राकेश काही तरी एकत्र करू शकू मात्र तो योग आता जुळून आला आहे. राकेश म्हणाला की मला ‘मुळशी पॅटर्न’ सारख्या चित्रपटात काम करायला आवडेल पण मी त्याला सांगितले की आता त्यापेक्षा वेगळ्या विषयावर चित्रपट करायचा आहे. पुढे आमच्या बोलण्यातून एक विषय आला त्यावर आम्ही चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले आहे. तर राकेश म्हणाला, मला मनापासून प्रविणबरोबर काम करण्याची इच्छा होती तो योग बाप्पांच्या मूर्तीच्या निमित्त्ताने जुळून आला आहे.

 

टॅग्स :गणेशोत्सवराकेश बापटप्रवीण तरडेसेलिब्रिटी गणेश