बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' मराठी सिनेमा नुकताच रिलीज झाला. केदार शिंदे दिग्दर्शित याच सिनेमाची महाराष्ट्रात चर्चा आहे. सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. गरीब परिस्थितीतून तो आज या स्टेजपर्यंत येऊन पोहोचला आहे. सूरज बिग बॉसचा विजेताही झाला आणि आता त्याचा पहिला सिनेमा रिलीज झाला आहे. बिग बॉसमध्ये पंढरीनाथ कांबळेने सूरजला खूप सांभाळून घेतलं होतं. आता सूरजचा सिनेमा पाहून पॅडी दादाने त्याचं कौतुक केलं आहे.
सूरज चव्हाणने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. 'झापुक झुपूक' सिनेमाच्या स्क्रीनिंगचा हा व्हिडिओ आहे. पॅडी दादाने स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. पॅडी दादांना बघून सूरजला खूप आनंद झाला. यावेळी पंढरीनाथ कांबळे सिनेमा पाहून म्हणाला, "आताच आमच्या सूरजचा 'झापुक झुपूक' सिनेमा बघितला. बिग बॉसमध्ये असताना सूरजला जे बघितलं होतं. तेव्हा त्याचं असं काहीतरी होईल मला अजिबात वाटलं नव्हतं. हे खूपच सरप्राइजिंग आहे. हा सुखद आश्चर्याचा धक्का आहे. केदारने त्याच्याकडून कमाल काम करुन घेतलं आहे. त्याला ज्या पद्धतीने सिनेमात प्रेझेंट केलं आहे ते खूपच छान झालं आहे. सिनेमाची गोष्टी, सर्वांचा अभिनय खूपच कमाल आहे. प्रत्येकाने एकदा तरी सूरजसाठी हा सिनेमा बघायला पाहिजे. सर्व टीमला शुभेच्छा."
'झापुक झुपूक' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमात सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत पायल जाधव, मिलिंद गवळी, दिपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार पाहायला मिळत आहेत. सिनेमाची गाणी प्रेक्षकांमध्ये आधीच हिट झाली आहेत.sacnilk ने दिलेल्या अहवालानुसार, 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी २४ लाखांची कमाई केली. याशिवाय दुसऱ्या दिवशीही 'झापुक झुपूक' सिनेमाने २४ लाखांची कमाई केली. अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये 'झापुक झुपूक' सिनेमाने ४८ लाखांची कमाई केलीय.