Join us

प्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:01 IST

त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे (Rahul Ghorpade) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने त्यांची  प्राणज्योत मालवली. नाटक, मालिका, सिनेमा अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपल्या संगीताने रसिकांचं मन जिंकलं होतं. त्यांच्या निधनाने कलाविश्वास शोककळा पसरली आहे. आज सकाळीच पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अतिशय सुरेल आवाज, आणि भाव कवितांचे प्रतिभावान प्रयोगशील संगीतकार म्हणून घोरपडे प्रसिद्ध होते. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा तीनहि माध्यमात गायक व निर्माता म्हणून काम करताना घोरपडे यांनी अनेक जाहिराती, अनुबोधपट, आणि रंगमंचावर अनेक नाटकांना संगीतबद्ध केलं. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा मराठे , मुकुंद फणसळकर, अशा अनेक गायक  गायिका त्यांच्या संगीत रचना गायले.

डाॅ. माधवी वैद्य यांच्या  "अग्निदिव्य" या मराठी चित्रपटाचं संगीतदिग्दर्शन राहुल घोरपडे यांनी केलं होतं. बीएमसीसी महाविद्यालयाच्या सुनिला पारनामे शाळेला चालली होती, सुतक, साहिर लुधिनवी यांच्या काव्यावर आधारित पडछाया हे सुधीर मोघे रुपांतरित संगीतक, जागर संस्थेची नंदनवन, दंभद्वीपचा मुकाबला, राजा इडिपस ही नाटकं,आणि अनन्वय संस्थेच्या कवी शब्दांचे ईश्वर दूरदर्शन मालिकेचे, गाणी बहिणाताईची,  व सर्व साहित्य संगीत विषयक प्रयोगांचे संगीत त्यांनी दिले. स्वर सौरभ या स्वतःच्या संस्थेतर्फे बनात जांभुळबनात, गाणी मंगेशकरांची, हे स्वप्नांचे पक्षी अशा भावगीतांचे कार्यक्रम त्यांनी निर्मिती करून रंगमंचावर शेकडो प्रयोग केले. आपल्या चाळीस वर्षांच्या संगीत कारकीर्दीत त्यांनी शेकडो रेडिओ जिंगल्स व टीव्ही जाहिराती संगीतबद्ध केल्या.

टॅग्स :संगीतसेलिब्रिटीमृत्यूमराठी चित्रपट