Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झिम्मा 2' अन् ' बाईपण भारी देवा'ला एकटी जेनेलिया देणार टफ फाईट; 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' नामांकन जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 18:38 IST

Maharashtracha favourite kon: महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर वोटिंग लाईन्स सुरू झाल्या आहेत.

प्रेक्षकांचं मनोरंजन करता यावं यासाठी कलाकार मंडळी वर्षभर दिवसरांत्र मेहनत करत असतात. या कामाच्या बदल्यात त्यांना प्रेक्षकांकडून प्रेमही मिळतं. मात्र, काही खास पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकारांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी सन्मानित केलं जातं. मराठी कलाविश्वात अनेक पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन केलं जातं. मात्र, या सगळ्यात चर्चा रंगते ती महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या गाजलेल्या सोहळ्याची. नुकतीच या पुरस्कार सोहळ्यासाठीची नामांकन जाहीर झाली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तत्पूर्वी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागांमध्ये नामांकन यादीत कोणत्या सेलिब्रिटींनी स्थान मिळवलं आहे. त्यांची यादी समोर आली आहे.

 दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट , फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री , फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक , फेवरेट लोकप्रिय चेहरा , फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक , फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत. 

'या' सिनेमांना नामांकन जाहीर

सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी 'वेड', 'बाईपण भारी देवा', 'सुभेदार' ,'महाराष्ट्र शाहीर' , 'वाळवी', 'नाळ २', 'झिम्मा २' ,  'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटांनी नाव कोरली आहेत. त्यामुळे प्रेक्षक पसंतीचा कौल यंदा कोणत्या सिनेमाला मिळतो आणि महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट कोणता ठरतो, हे लवकरच समजणार आहे .

‘फेवरेट दिग्दर्शक’ या नामांकनामध्ये रितेश देशमुख, केदार शिंदे , दिग्पाल लांजेकर, परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी सुधाकर रेड्डी यक्कंटी, हेमंत ढोमे , हेमंत अवताडे यांची वर्णी लागली आहे. तर,  ‘फेवरेट अभिनेता’  या विभागातील नामांकनासाठी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी,  रितेश देशमुख, सुबोध भावे, नागराज मंजुळे आणि अजय पुरकर यांची नावे असून ‘फेवरेट अभिनेत्री’ या विभागाअंतर्गत ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील अभिनेत्रींची टीम तसेच 'वेड' चित्रपटासाठी जिनिलिया देशमुख, ‘झिम्मा 2’ या चित्रपटातील अभिनेत्रींची टीम आणि 'वाळवी' साठी शिवानी सुर्वे यांच्या नावांचा समावेश आहेत.

दरम्यान,  महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर वोटिंग लाईन्स सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जाहीर झालेल्या नावांमधून रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतानंतर ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ ही मानाची ट्रॉफी कलाकारांना दिली जाणार आहे. यासाठी रसिक प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात, त्यासाठी झी 5 च्या वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराला वोट करू शकतात. तसंच 77 99947231 ते 37 या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमचे मत देऊ शकता किंवा 99660 21 900 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास थेट व्हाट्सअप वर तुम्हाला वोटिंग डिटेल्स मिळतील यावरही रसिक प्रेक्षक त्यांचे वोट देऊ शकतात. इतकंच नाही तर mfkzee talkies.zee5.com या वेबसाईटवरही वोटिंग सुविधा उपलब्ध आहे. 

टॅग्स :सिनेमाटेलिव्हिजनजेनेलिया डिसूजारितेश देशमुखसेलिब्रिटी