Join us

"त्याचं मानसिक दडपण आलं...", ट्रोलिंगवर क्रांती रेडकरचं भाष्य, म्हणाली- "काही कमेंट्स..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:11 IST

"त्याचं मानसिक दडपण आलं...", अभिनेत्री क्रांती रेडकर नेमकं कशाबद्दल बोलतेय?

Kranti Redkar: हल्लीच्या काळात सोशल मीडिया या माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.सोशल मीडिया जितकं एखाद्याचं कौतुक केलं जातं तितकंच त्याला ट्रोल देखील केलं जातं. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळींनाही याचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही कलाकार ट्रोलिंगवर वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. यावर मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

अलिकडेच मातृदिनानिमित्त अभिनेत्री क्रांती रेडकरने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंवर भाष्य केलं आहे. यावर बोलताना क्रांती रेडकर म्हणाली, "आता जे मला काही सोशल मीडियावर कमेंट्स येतात ना की, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अतिशुद्ध उच्चार का करता?  किंवा तुमचे मराठीचे उच्चार खोटे वाटतील इतके शुद्ध का असतात? तर त्याचं मुळात कारण हे आहे की, मी त्याच्यावरून माझ्या सिनिअर्सकडून, शुभचिंतकांकडून खूप ऐकलं आहे. "

त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं, "ते मला कायम सांगायचे क्रांती मराठीवर काम कर...! सतत मराठीवर काम करून करूनही आपली भाषा आपल्याला कशी येऊ शकत नाही? किंवा आपले उच्चार का चुकतात? याचं मला इतकं मानसिक दडपण आलं होतं की त्याच्यानंतर मी त्याच्यावर काम करुन मग अनेक शोज अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन पासून सगळे सगळं केलं. शिवाय मराठी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं आहे.  मग तर 'तू तू मी मी'  माझं पहिलं नाटक होतं आणि त्याच्याबरोबर 'श्रीमंत दामोदर पंत' हे नाटक करू लागले." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

क्रांती रेडकरच्या वर्कफ्रंबद्दल बोलायचं झालं तर तिने 'माझा नवरा तुझी बायको', 'फक्त लढ म्हणा', 'जत्रा', 'करार', 'फूल-३ धमाल' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या क्रांती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

टॅग्स :क्रांती रेडकरसेलिब्रिटीसोशल मीडिया