Join us

'जाडेपणा हा अडसर नाही ते माझं वेगळेपण'; ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 11:50 IST

vishakha subhedar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडी एक्स्प्रेस' अशा कितीतरी कार्यक्रमातून विशाखाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे विशाखा सुभेदारचं मराठी कलाविश्वात एक दबदबा निर्माण झाला आहे.

आपल्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar). 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडी एक्स्प्रेस' अशा कितीतरी कार्यक्रमातून विशाखाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे विशाखा सुभेदारचं मराठी कलाविश्वात एक दबदबा निर्माण झाला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री म्हणजे बारीक, सुंदर ही जी व्याख्या आहे ती तिने खोडून काढली आहे. अभिनेत्री असण्यासाठी रंगरुप गरजेचं नाही. तर, त्यासाठी अंगी कला असणं गरजेचं आहे हे तिने दाखवून दिलं आहे. अलिकडेच तिने 'लोकमत सखी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वजनावरुन वा शरीरयष्टीवरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

" मी करिअरला सुरुवात केली किंवा ज्यावेळी मी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हापासून माझी फिगर जाडच आहे. मी आधी खूप बारीक होते,मग जाड झाले असं काही झालं नाही. पण सुरुवातीपासून लोकांनी मला मी जशी आहे तसं स्वीकारलं. त्यामुळे मला जाडेपणामुळे फार संघर्ष करावा लागला असं नाही. प्रेक्षकांनी आणि दिग्दर्शकांनी मला आहे तसं स्वीकारलं," असं विशाखा म्हणाली.

लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारचा पतीदेखील आहे अभिनेता; मराठीसह हिंदी कलाविश्वात केलंय काम 

पुढे ती म्हणते, ''मी जशी आहे तसं मला स्वीकारलं गेलं त्यामुळे मला जाडेपणा हा अडसर न वाटता ते माझं वेगळेपण आहे असं मला वाटतं.''

दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसंच तिने यावेळी सौंदर्याचे चुकीचे मापदंड (BreakTheBias) याविषयावर तिची मतंही मांडली.  विशाखा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक कार्यक्रमांसह मालिका, चित्रपटांमध्येही काम केलं आहे. यात 'मस्त चाललंय आमचं', 'येड्यांची जत्रा', 'अरे आवाज कोणाचा', 'झपाटलेला २', 'सासूच स्वयंवर', 'दगडाबाईची चाळ', 'ये रे ये रे पैसा' अशा कितीतरी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन