Join us

"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:54 IST

महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू, असं म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला चिन्मयी सुमीतचं सडेतोड उत्तर

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यापासून सुरू झालेला वाद आता मराठी विरुद्ध हिंदीपर्यंत येऊन पोहोचला आहे. बिजनेसमॅन सुशील केडीया, भोजपुरी अभिनेता निरहुआ यांच्यानंतर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय व्यापाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर निशिकांत दुबेंना आक्रमक होत हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असं विधान केलं. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू, असंही ते म्हणाले होते. 

निशिकांत दुबेंच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री चिन्मयी सुमीतने त्यांना कडक शब्दांत उत्तर दिलं आहे. "त्या खासदाराला मी त्यांच्या भाषेत उत्तर देणार नाही. कारण, ती माझी भाषा नाही. पण, तरीसुद्धी हिंदीत बोलायचा प्रयत्न करते. कारण, हिंदीवर माझं मनस्वी प्रेम आहे", असं चिन्मयी सुमीत साम टीव्हीशी बोलताना म्हणाली. त्यानंतर तिने हिंदीतून निशिकांत दुबे यांना चोख उत्तर दिलं. 

"मै आपको बताना चाहूंगी जो बात आपने की है वो बहोत ही भद्दी है... उसकी मै कडी निंदा करती हूँ. दुसरी बात महाराष्ट्र में हर कार्यक्रम मे हम जो पहले महाराष्ट्र गीत गाते है...तो हमसे ये बात ना किजिए तो अच्छा है...हम आपसे और आपसे भाषा से प्यार करते है...तो वही सन्मान हमको मिलना चाहिए.. आप यहाँ पे आके आपकी रोजी रोटी कमाते हो तो हमारी भाषा को भी आप गले लगाइए जैसे हमने आपके भाषा को लगाया है", असं हिंदीतून उत्तर चिन्मयी सुमीतने दिलं आहे. 

(मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे विधान तुम्ही केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही महाराष्ट्र गीत गातो. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही तुमच्यावर आणि तुमच्या भाषेवरही प्रेम करतो. तर तोच सन्मान आम्हालाही मिळायला हवा. तुम्ही इथे येऊन तुमची रोजी रोटी कमावता तर आमच्या भाषेवरही प्रेम करा जसं आम्ही तुमच्या भाषेवर करतो)

काय म्हणाले होते भाजपा खासदार निशिकांत दुबे? 

तुम्ही काय म्हणत आहात की, मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. टाटाने तर पहिला कारखाना बिहारमध्ये बनवला. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुमच्याकडे कोणता उद्योग आहे? खाणी आमच्याकडे आहेत. झारखंडकडे आहेत. मध्य प्रदेशकडे आहेत. छत्तीसगडकडे आहेत. ओडिशाकडे आहेत. तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिलायन्सनेही रिफायनरी गुजरातमध्ये सुरू केली आहे. सर्व उद्योग मग सेमी कंडक्टरचा उद्योगही गुजरातकडे येत आहेत.  जर तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात, तर उर्दू भाषिकांनाही मारा. तामिळी लोकांना मारा. तुम्ही जी ही नीच कृत्य करत आहात. मी म्हटले आहे की, तुम्ही जर बॉस आहात, तर चला बिहारला. चला उत्तर प्रदेशला. तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू. ही अराजकता चालणार नाही. 

टॅग्स :चिन्मयी सुमीतसेलिब्रिटी