Join us

"ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक"; महेश कोठारेंचा मोठा खुलासा, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:46 IST

महेश कोठारेंनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चुकीमुळे त्यांना अजूनही कसा पश्चाताप होतोय, याचा खुलासा केलाय,

महेश कोठारे (mahesh kothare) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. महेश यांना आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही महेश यांनी नाव कमावलंय. महेश यांचे अनेक सिनेमे म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते. एका मुलाखतीत मात्र महेश कोठारे यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चुकीची कबूली दिली. करिअरमध्ये घडलेली ती चूक महेश यांना आजही सतावते. काय घडलं होतं?

महेश यांच्याकडून घडली ती चूक

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले. परंतु एका सिनेमामुळे महेश कोठारेंचं  मोठं नुकसान झालं. घडलं असं की, १९८७ साली आलेला 'दे दणादण' सिनेमा खूप लोकप्रिय ठरला. महेश-लक्ष्याच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. या सुपरहिट सिनेमाचा महेश कोठारेंनी 'लो में आ गया' नावाने हिंदी रिमेक केला. मराठी सिनेमा सुपहिट झाला म्हणून हिंदी सिनेमाही चालेल, याची महेश कोठारेंना खात्री होती.

'लो में आ गया' सिनेमात गोविंदाचा भाचा विनय आनंद प्रमुख भूमिकेत होता. याशिवाय या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू,  मोहन जोशी, प्रेम चोप्रा, दीपक शिर्के हे कलाकारही होते. मराठी सिनेसृष्टीत काम करताना १५ वर्ष कमावलेले सर्व पैसे महेश यांनी या सिनेमासाठी खर्च केले. १९९९ साली 'लो में आ गया' सिनेमा रिलीज झाला. आता प्रतीक्षा होती सिनेमाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल त्याची...

परंतु चित्र पूर्ण उलटं झालं. 'लो में आ गया' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.  सिनेमासाठी महेश कोठारेंनी जे पैसे खर्च केले होते ते सुद्धा वसूल झाले नाहीत. महेश कोठारेंसाठी हा मोठा धक्का होता. त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे कर्जाचा डोंगर इतका वाढला की, त्यांना राहतं घरही विकावं लागलं. त्यावेळी महेश यांचा लेक आदिनाथ केवळ १० वर्षांचा होता.  'लो में आ गया'मुळे निर्माण झालेली आर्थिक पोकळी भरुन यायला महेश यांना पुढे अनेक वर्ष गेली. आज महेश कोठारे मराठी मालिका, सिनेसृष्टीत नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट निर्माण करणारे निर्माते आहेत. 

टॅग्स :महेश कोठारेलक्ष्मीकांत बेर्डेअशोक सराफमराठी अभिनेतामराठी चित्रपटआदीनाथ नवले