Sachin Goswami Post: महाराष्ट्रात मराठी सिनेमांना डावलून हिंदी किंवा इतर भाषेच्या सिनेमांना थिएटर उपलब्ध करून दिली जातात असे आरोप अनेकदा होताना दिसतात. त्यात आता 'ये रे ये रे पैसा-३' या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने शो उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे हा वाद नव्याने उफाळून येण्याची शक्यता आहे. अलिकडेच संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, दुसरीकडे सैयारा हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. 'सैयारा' सिनेमामुळे येरे येरे पैसा ३ या मराठी सिनेमाला स्क्रीनिंग मिळत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येताना दिसता आहेत. उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता या संदर्भात ट्विट करत भाष्य केलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्ट लिहून सचिन गोस्वामींनी लिहिलंय की, "एक हिंदी सिनेमा जोरात चालला आहे म्हणून मराठी सिनेमा ला दुसरा आठवड्याची संधी मिळत नाही हे दुर्दैवी आहे. मराठी सिनेमाला अनेकदा दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षक यायला लागतो.त्यावेळी मराठी सिनेमाची थिएटर्स हिंदी सिनेमाच्या दबावात कमी होतात आणि त्याची व्यवसाय करण्याची क्षमता संपते हे सतत होतय. यावर ठोस उपाय झाला पाहिजे..किमान दोन आठवडे शोज मिळाले पाहिजे." असं सचिन गोस्वामी यांनी या पोस्टद्वारे म्हटलं आहे. "
सैयारा vs येरे येरे पैसा ३
सध्या बॉक्स ऑफिसवर 'सैयारा' सिनेमाने दबदबा निर्माण केला आहे. या सिनेमातून अहान पांडे आणि अनीत पड्डा हे नवे चेहरे या सिनेमात पाहायला मिळत आहेत. अहान पांडेने या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अहान हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. दुसरीकडे संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' सिनेमाची चर्चा आहे. उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.