राजश्री प्रोडक्शनचा १९८४ साली आलेला 'अबोध' सिनेमा. हा 'धकधक गर्ल'माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) पहिलाच सिनेमा. यातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तेव्हा माधुरी फक्त १० वीत होती. या सिनेमात अशोक सराफही (Ashok Saraf) होते. नुकतंच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी माधुरीसोबतची आठवण सांगितली. अबोध सिनेमावेळी ती शाळेत शिकणारी माधुरी कशी होती आणि आता कशी आहे यावरही ते बोलले.
'रेडियो नशा'ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले, "राजश्रीसोबत मी अबोध केला. त्यात माधुरी होती. तेव्हा ती शाळेत होती. अगदी साधी मुलगी, शांत बसली होती. पण तिचा चेहरा, तिचं सौंदर्य कमाल होतं. ती १०- ११वीत होती. तिच्या शाळेमुळे शूटिंगही थांबवण्यात आलं. तिला सुट्टी मिळाल्यानंतर आमचं शूटिंग झालं होतं. तो तिचा पहिला सिनेमा होता. माझाही राजश्रीसोबत पहिलाच होता. नंतर आम्ही अनेक सिनेमे केले. पण माधुरी अजिबात बदलली नाही. आजही ती तशीच साधी मुलगीच आहे. मराठी कलाकार असे असतात ज्यांना फक्त मेहनतीने काम करायचं असतं. तीही अशीच होती आणि आजही ती तशीच साधी आहे."
यानंतर अशोक सराफ आणि माधुरी 'कोयला', 'प्रेम दीवाने' या सिनेमातही एकत्र होते. माधुरी नंतर स्टार झाली. 'धकधक गर्ल'अशी तिची ओळख बनली. मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळवलं. अशोक सराफही अनेक हिंदी सिनेमांमध्ये छोट्या भूमिकेत झळकले. यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
अशोक सराफ यांचा 'अशीही जमवाजमवी' सिनेमा रिलीज झाला. त्याआधी ते 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये दिसले. सध्या ते 'अशोक मा.मा.' मालिकेत भूमिका साकारत आहेत.