Join us

"छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.."; महापुरुषांचा दाखला देत हिंदवी पाटील काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:51 IST

भर कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी हिंदवी पाटीलने दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. सर्वांसमोर हिंदवीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

पहलगाम हल्ल्याचा सर्वच स्तरांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. मराठी, हिंदी आणि जगभरातील कलाकार, क्रिकेटर, राजकीय व्यक्ती या हल्ल्याविरोधात तीव्र निदर्शनं दर्शवत आहेत. अशातच मराठीतील प्रसिद्ध नृत्यांगना आणि लावणीसम्राज्ञी अशी ओळख असलेली हिंदवी पाटीलने या हल्ल्याचा तिच्या कार्यक्रमात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. इतकंच नव्हे हिंदवीने सर्व प्रेक्षकांच्या साथीने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

दौंडमधील कार्यक्रमात लावणी कलावंत हिंदवी पाटील हिने 'पाकिस्तान मुर्दाबादच्या' घोषणा दिल्या. त्यावेळी हिंदवी म्हणाली की, धर्मभेद, जातभेद यांच्याबद्दल कधीच कोणी बोललं नव्हतं.  ना छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते, ना परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलले होते. सर्व धर्म, सर्व समान या गोष्टीवर चालणारी ती दोन महान माणसं. तरीपण धर्म विचारुन अशी मारामारी होत असेल. पाकिस्तान मुर्दाबाद. शहीद झालेल्या सर्वांना न्याय मिळावा, त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा, त्यांच्या लहान लहान लेकरांना न्याय मिळावा ही भारतमातेच्या चरणी माझी इच्छा आहे. 

अशाप्रकारे हिंदवीने तिचा संताप व्यक्त केलाय. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पहलगाम  येथे पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेबद्दल सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत.

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लामराठी चित्रपट