सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट २' (Premachi Goshta 2) सिनेमा लवकरच येत आहे. नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूक आणि टीझर समोर आला. ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. टीझरमध्ये स्वप्नील जोशी आणि भाऊ कदमही दिसले. ललितसोबत 'पाणी' फेम अभिनेत्री ऋचा वैद्य झळकणार आहे. याशिवाय सिनेमात हिंदी अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहे. या अभिनेत्रीचं नाव मधल्या काळात क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडलं गेलं होतं. कोण आहे ही अभिनेत्री?
सतीश राजवाडेंचा २०१३ साली 'प्रेमाची गोष्ट' हा मराठी सिनेमा खूप गाजला होता. अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे आणि सुरेखा तळवलकर यांची सिनेमात मुख्य भूमिका होती. आता सतीश राजवाडेंनी 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा केली आहे. ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, ऋचा वैद्य आणि रिद्धीमा पंडित यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.
रिद्धीमा पंडित (Ridhima Pandit) ही हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचली. 'बहु हमारी रजनीकांत' ही तिची गाजलेली मालिका. याशिवाय ती 'बिग बॉस ओटीटी' आणि 'खतरों के खिलाडी'मध्येही झळकली. रिद्धीमा मधल्या काळात भलत्याच कारणामुळे चर्चेत आली होती. भारतीय क्रिकेट संघातील युवा क्रिकेटपटू शुभमन गिलला ती डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नंतर रिद्धीमाने या सर्व चर्चा अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आता ती मराठी सिनेमात पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
'प्रेमाची गोष्ट २' हा प्रेम आणि नशीबाचा जादुई प्रवास दाखवणारा फँटसी सिनेमा असणार आहे. संजय छाब्रिया यांनी सिनेमाची निर्मिती केली असून अमित भानुशाली सहनिर्माता आहे. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २२ ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.