अभिनेता क्षितीश दाते (kshitish date) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. क्षितीशने आजवर विविध मराठी मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये काम केलंय. रंगभूमीपासून क्षितीशने केलेली सुरुवात आज त्याला एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळख देऊन गेलीय. क्षितीशने 'धर्मवीर'च्या दोन्ही भागांमध्ये साकारलेली एकनाथ शिंदेंची भूमिका चांगलीच गाजली. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी शूटिंगचा अनुभव कसा होता, याचा खुलासा क्षितीशने केलाय.
क्षितीशने सांगितला एकनाथ शिंदेंच्या घरी शूटिंगवेळेसचा किस्सा
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत क्षितीश म्हणाला की, "आम्ही एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं. प्रवीण सर असल्यामुळे काहीही शक्य आहे. 'आपण शिंदेसाहेबांच्या केबिनमध्ये शूटिंग करायचं. शिंदेसाहेबांच्या घराचा जो सुरुवातीचा भाग तिथे खूँखार सीन आहे.', असं प्रवीण सर म्हणाले होते. यानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या घरी जाणं झालं. वर्षा बंगल्यावर, नंदनवन बंगल्यावर जाणं झालं. त्यांच्या घराबाहेर रांग असते लोकांची. ते जनतेला, कार्यकर्त्यांना भेटतात. ठाण्यामध्ये आम्ही दोन वर्ष सिनेमासाठी होतो. दुकानदारापासून, चहाच्या टपरीवाल्यापासून ते फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकापर्यंत प्रत्येकजण हेच म्हणतो की, 'शिंदेसाहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलंय.'"
"धर्मवीरच्या प्रमोशनवेळेस एकनाथ शिंदे समोर होते तेव्हा मी खूप घाबरलो होतो. ऑकवर्ड झालो होतो. पण परफॉर्मरचा गंड असल्याने ते आपल्याला निभावून न्यावं लागतंच आणि ते आपण निभावतो. तेव्हा प्रसाददादाने (प्रसाद ओक) खूप सपोर्ट केला. त्यांना तुझं काम आवडलंय, तू १० - १५ मिनिटांचा परफॉर्मन्स मस्त कर, फडणवीस समोर बसले आहेत, सलमान खान समोर आहे, तू आता कच खाऊ नकोस, असं तो मला म्हणाला.", अशाप्रकारे क्षितीशने खास अनुभव शेअर केला.