Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुलकंद'ला महाराष्ट्रात हाउसफुल्ल प्रतिसाद! पहिल्या दिवशी सिनेमाने किती कमाई केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:08 IST

'गुलकंद' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे (gulkand)

काल १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मराठी सिनेसृष्टीत दोन सिनेमे रिलीज झाले.  ते सिनेमे म्हणजे 'आता थांबायचं नाय' आणि 'गुलकंद'. या दोन्ही सिनेमांची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यापैकी 'गुलकंद' सिनेमा महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी बनवला आहे. या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. इतकंच नव्हे गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. सिनेमाचे कलाकार स्वतः प्रत्येक प्रमोशनमध्ये भाग घेत आहेत. याचाच परिणाम सिनेमाच्या कमाईवर झालेला दिसतोय. 'गुलकंद' सिनेमाने (gulkand movie) पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घ्या

'गुलकंद' सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई

काल १ मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीचा 'गुलकंद' सिनेमाला चांगलाच फायदा झालेला दिसत आहे. पहिल्याच दिवशी 'गुलकंद' सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. sacnilk च्या अहवालानुसार 'गुलकंद' सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ५५ लाखांची कमाई केली आहे. एकूणच सर्वांना सिनेमा आवडत असून ज्यांनी ज्यांनी सिनेमा पाहिला आहे ते सर्वजण 'गुलकंद' सिनेमाचं कौतुक करत आहे. आगामी शनिवार,  रविवारमध्ये 'गुलकंद' सिनेमा कोटींचा आकडा सहज पार करेल, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिनेमा फॅमिली एंटरटेनर असल्याने सहकुटुंब सर्वजण 'गुलकंद' पाहण्याचा आस्वाद घेत आहेत.

'गुलकंद' सिनेमाविषयी

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका असून सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आगामी दिवसांमध्ये 'गुलकंद' सिनेमा किती कमाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरसमीर चौगुलेप्रसाद ओक मराठी चित्रपटमराठी अभिनेता