Join us

पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:35 IST

मला सतत ट्रोल का केलं जातं? गौतमी पाटीलला रडू कोसळलं

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने ३० सप्टेंबर रोजी पुण्यात एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात रिक्षात बसलेले इतर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे. ते सध्या आता व्हेंटिलेटर असल्याची माहिती समोर आली आहे. एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, किंवा साधा एक मेसेजही आला नाही असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केला होता. याबाबत पोलिसही सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. दरम्यान गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी क्लीन चीटही दिली आहे. या सर्व प्रकरणावर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. 

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील भावुक झाली. म्हणाली, "ही दुर्घटना घडली तेव्हा मी गाडीत नव्हते.  फक्त ड्रायव्हर होता. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी त्याचवेळी माझ्या एका मानलेल्या भावाला मी तिथे पाठवलं. मी मदतीचा हात पुढे केला. माझ्याकडून होईल ते सगळं केलं. पण समोरुन मला अशी प्रतिक्रिया आली की आम्ही कायदेशीर प्रक्रिया करु. त्यांनी मदत घेतली नाही. मी ठिके म्हटलं...नंतर मला सगळे ट्रोल करत सुटलेत. याला अर्थ नाही. जिथे संबंध नाही तिथे मला बदनाम केलं जात आहे. सगळं कायदेशीर सुरु आहे तर तसंच होऊ दे ना."

मी पोलिसांनाही व्यवस्थित सहकार्य केलं. मी कुठे होते, माझी कागदपत्रं अशी सगळी माहिती मी त्यांना दिली. त्या कुटुंबियांना मी भेटले नाही हे खरं आहे. पण माझ्या कार्यक्रमाच्या तारखा अगोदरच घेतलेल्या असतात. समोरचे लोक खूप खर्च करतात. त्यामुळे मला वेळ मिळाला नाही. पण माझे भाऊ वगैरे तिथे जाऊन आले. त्यांनाच जर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतील तर मग मी कसं जाऊ? मी इतके दिवस शांत होते पण मला सतत ट्रोलिंग चालूच आहे. ते काही मला नवीन नाही. पण या गोष्टीशी माझा थेट संबंध येत नाही मग माझ्या नावानेच का एवढं चाललंय. अशा गोष्टी बाकी ठिकाणीही घडतात. जी दुर्घटना घडली ती व्हायला नकोच होती. पण यावरुन मला का बोललं जात आहे. माझा ड्रायव्हर मला विचारुनच गाडी घेऊन गेला होता. पण मला नंतर काहीच माहित नव्हतं. पोलिसांनी कॉल रेकॉर्डही तपासले आहेत. माझं ड्रायव्हरशी नंतर काहीही बोलणं झालं नाही."

चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' व्हिडिओवर गौतमी म्हणाली, "वाईट तर वाटणारंच. मला त्या दादांनाही काही बोलायचं नाही. तो तो त्याच्या परीने बोलतो. मला इतकंच म्हणायचंय की या गोष्टीशी माझा संबंध येत नाही. गाडी फक्त माझी आहे पण मी गाडीत नव्हतेच. एखाद्याला किती ट्रोल करावं. मी या चार दिवसात खूप रडले. पहिल्या दिवसापासूनच मी ट्रोल होत आहे. तुम्ही नक्की काय घडलं तेही बघा ना. मला का दोष देताय?"

English
हिंदी सारांश
Web Title : Gautami Patil breaks down over Pune accident; responds to criticism.

Web Summary : Gautami Patil addresses the Pune accident involving her car. She wasn't present, offered help, but faced trolling. Patil emphasizes her lack of direct involvement and expresses distress over unwarranted criticism, highlighting police investigation confirmed her alibi. She reacted to Chandrakant Patil's video, expressing her sadness.
टॅग्स :गौतमी पाटीलपुणेअपघात