'धर्मवीर' सिनेमा सर्वांना माहित असेलच. प्रसाद ओकने सिनेमात आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. तर सिनेमात आणखी एक व्यक्तिरेखा चांगलीच गाजली ती म्हणजे अभिनेता क्षितीश दातेची. क्षितीश दातेने सिनेमात साकारलेली एकनाथ शिंदेंची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली. क्षितीशचे पणजोबाही मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते होते हे फार कमी जणांना ठाऊक असेल. क्षितीशने याविषयी खुलासा करुन सर्वांना ही गोष्ट सांगितली.
क्षितीशचे पणजोबाही अभिनेते
क्षितीशने पोस्ट करुन त्याच्या आजोबांचा साहित्य संघ गिरगाव येथील नाट्यगृहाचा फोटो दाखवलाय. हा फोटो दाखवून क्षितीश लिहितो की, "साहित्य संघाच्या मेकअप रुममध्ये पणजोबांचं स्केच बघून खूप भारी वाटलं! पहिल्यांदाच या स्टेजवर पाऊल ठेवलं. जरा उशीरच झाला. नाटकवाला म्हणून हे कधीच व्हायला हवं होतं. असो. पण जिथे केशवरावांनी अनेक नाट्यप्रयोग सादर केले, तिथेच उभे राहून आपण काही मोडका तोडका प्रयत्न करत आहोत ही भावना अद्भुत आहे!"
क्षितीशचे पणजोबा कोण होते
क्षितीशचे पणजोबा केशवराव दाते हे भारतीय मनोरंजन विश्वातील एक दिग्गज रंगकर्मी होते. केशवरावांनी १८८९ ते १९७१ या काळात विविध नाटकं, सिनेमांमधून त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. सुरुवातीच्या काळात मूकपटात काम करुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही काही सिनेमांची जबाबदारी सांभाळली. आज केशवरावाचा नातू अर्थात क्षितीश दातेही मराठी मनोरंजन विश्व गाजवतोय. क्षितीशचं नवं नाटक 'मी vs मी' ची सध्या चर्चा आहे.