ज्या सिनेमाची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो 'दशावतार' सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेल्या 'दशावतार' सिनेमातून कोकणातील प्रसिद्ध असलेल्या दशवतारी लोकपरंपरेची झलक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'दशावतार' सिनेमाचा प्रिमियर नुकताच पार पडला. या प्रिमियरला सिनेविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.
'दशावतार' सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळचा आदित्य ठाकरेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये आदित्य ठाकरे इतर कलाकांसोबत बोलताना दिसत आहेत. तेवढ्यात दिलीप प्रभावळकर एन्ट्री घेत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दिलीप प्रभावळकरांना पाहताच आदित्य ठाकरे त्यांना वाकून नमस्कार करत त्यांच्या पाया पडतात. आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, 'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, महेश मांजरेकर, रवी काळे, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे अशी स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १२ सप्टेंबरपासून सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.