Dashavtar: मराठीतील बहुप्रतीक्षित 'दशावतार' सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शन घडवून आणलं. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. आता सिनेमाचं तीन दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे.
पहिल्या दिवशी 'दशावतार' सिनेमाला हवा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे सिनेमाला केवळ ५८ लाख रुपये इतकीच कमाई करता आली. मात्र वीकेंडला प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला. शनिवारी आणि रविवारी 'दशावतार'चे शो हाऊसफुल झाले होते. या दोन्ही दिवशी 'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई केली आहे. शनिवारी १.३९ कोटींचा गल्ला जमवण्यात 'दशावतार'ला यश आलं. तर रविवारी तब्बल २.४ कोटींची कमाई सिनेमाने केली आहे. त्यामुळे तीनच दिवसांत या सिनेमाने ४.३७ कोटींचा आकडा पार केला आहे. 'दशावतार' सिनेमापुढे बाघी ४, द बंगाल फाइल्स हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले आहेत.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, विनोद तावडे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.