Join us

थिएटर गाजवणारा 'दशावतार' ऑनलाईन झाला लीक; प्रियदर्शिनीची प्रेक्षकांना कळकळीची विनंती, म्हणाली- "चित्रपटाची चोरून काढलेली प्रत फोनवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:22 IST

थिएटर गाजवणारा आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा 'दशावतार' सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने याबाबत पोस्ट करत प्रेक्षकांना विनंती केली आहे. 

सध्या जिकडे तिकडे 'दशावतार' या मराठी सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धमाका केला आहे. बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. मात्र थिएटर गाजवणारा आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा 'दशावतार' सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने याबाबत पोस्ट करत प्रेक्षकांना विनंती केली आहे. 

'दशावतार'ला पायरसीचा धोका आहे. प्रियदर्शिनीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना पायरसी सिनेमा न बघण्याची आणि 'दशावतार' थिएटरमध्ये येऊनच बघण्याची विनंती केली आहे. "कळकळीची विनंती... आपल्या 'दशावतार' सिनेमाला तुम्हा रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मराठी प्रेक्षकांची ताकद काय आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात दिसतंय. पण त्याच वेळी काही लोक चित्रपटाची चोरून काढलेली प्रत फोनवर डाऊनलोड करुन पाहत आहेत. चित्रपटाच्या पायरसीविरुद्ध कारवाई सुरू आहेत. परंतु, आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटाबद्दल असं करणं दु:खद आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे या पोस्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की "चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन घ्यायचा अनुभव आहे. त्यासाठी शेकडो लोकांची मेहनत आणि पैसा लागलेला आहे. निदान मराठी माणसांनी तरी अश्या चोरटेपणाला थारा देऊ नये. स्वत: ही अशी पायरेटेड प्रिंट फोनवर पाहू नये आणि इतरांनाही त्यापासून रोखावे ही विनंती! आपल्याच सहकार्यातून मराठी चित्रपट जगणार, तगणार आणि वाढणार आहे". 

'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनिल तावडे, विजय केंकरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला असून आत्तापर्यंत सिनेमाने ६ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर सिनेमाटिव्ही कलाकार