Dashavtar: मराठीतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला 'दशावतार' सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शन घडवून आणलं. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक पहिल्या दिवसापासूनच गर्दी करत आहेत. पाच दिवसांनंतरही 'दशावतार'ची क्रेझ कमी झालेली नाही.
'दशावतार'ने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपये कमावले होते. 'दशावतार'सोबतच आणखी दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. त्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरू शकेल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र 'दशावतार'ने बॉलिवूडलाही गार केलं. वीकेंडला सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. 'दशावतार'ने शनिवारी-रविवार मिळून तब्बल ४ कोटींच्या घरात कमाई केली. रविवारी 'दशावतार'चं कलेक्शन दुप्पटीने वाढलं. मात्र सोमवारी सिनेमाच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली. 'दशावतार'ने चौथ्या दिवशी १.१ कोटींचा बिजनेस केला.
आता 'दशावतार' सिनेमाचं पाच दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. सोमवारी कमाईत घट झाली तरी 'दशावतार'ने मंगळवारी मात्र पुन्हा बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. पाचव्या दिवशीही 'दशावतार'ने कोटींमध्ये बिजनेस केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने मंगळवारी १.३० कोटींचा गल्ला जमवला. प्रेक्षकांसाठी 'दशावतार'च्या टीमने मंगळवारी खास ९९ रुपयांत सिनेमाचं तिकीट उपलब्ध करून दिलं होतं. या खास ऑफरचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसलं. अशाप्रकारे 'दशावतार'ने आत्तापर्यंत ६.८० कोटींची बिजनेस केला आहे.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, सुनिल तावडे, विजय केंकरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.