'विचार म्हणून खतरनाक...', हेमांगी कवीच्या अंतर्वस्त्रावरील 'त्या' पोस्टला प्रवीण तरडेचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:41 IST
स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने भले मोठी पोस्ट टाकत चांगलेच सुनावले.
'विचार म्हणून खतरनाक...', हेमांगी कवीच्या अंतर्वस्त्रावरील 'त्या' पोस्टला प्रवीण तरडेचा पाठिंबा
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि या माध्यमातून ती बऱ्याचदा तिचे मत रोखठोक मांडताना दिसते. नुकतेच एका व्हिडीओमुळे हेमांगी कवीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने भले मोठी पोस्ट टाकत चांगलेच सुनावले. तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. इतकेच नाही तर अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टवर सहमती दर्शवली आहे.अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी कमेंट करत हेमांगीला पाठिंबा दिला आहे.
हेमांगी कवीने सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवर ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ यावर आपले मत मांडले आहे. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रियांवर कपड्यांवर असणाऱ्या बंधनांवर आणि समाजातील मानसिकतेवर बेधडक मत मांडले आहे. त्यानंतर प्रविण तरडेने तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. प्रविण तरडेने लिहिले की, विचार म्हणून खतरनाक ऽऽऽऽ.. लेखन म्हणून वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी.
हेमांगी कवीने भली मोठी पोस्ट इंस्टाग्रामवर भली मोठी पोस्ट टाकली आहे. तिने म्हटले की, पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं...ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती स्ट्रगल करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!
तिने पुढे म्हटले आहे की, आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही! बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो! याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींंशी काही संबंध नाही! अरे किती ती बंधनं? किती ते 'लोक काय म्हणतील' चं ओझं व्हायचं? अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या! खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छेने ब्रा न घालता वावरणे , दिसणारे निपल्स बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी!, असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.