पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मराठी, हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. ९० च्या दशकात त्यांच्या सिनेमांनी थिएटर गाजवले. मराठीत 'अशीही बनवाबनवी','धूमधडाका','शेजारी शेजारी' 'साडे माडे तीन' असे एकापेक्षा एक हिट सिनेमे त्यांनी दिलेच. शिवाय हिंदीतही त्यांची दखल घेतली गेली. 'करण अर्जुन','येस बॉस','अबोध' अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये ते झळकले. नुकतंच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी करण-अर्जुन सिनेमाचा किस्सा सांगितला. तसंच ते शाहरुख-सलमानबद्दलही काय म्हणाले वाचा.
'रेडियो नशा'ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी 'करण-अर्जुन'ची आठवण सांगितली. ते म्हणाले, "करण अर्जुन सुपरहिट होता. मला त्या सिनेमाने खूप लोकप्रियता दिली. त्यात मी ना हिरो आहे ना व्हिलन. माझं कॉमेडी कॅरेक्टर आहे. मी गुजराती-मारवाडी बोलतो. 'ठाकुर ते ग्यो'हा माझा डायलॉग खूप गाजला. साधा डायलॉग होता पण ती बोलण्याची स्टाईल भन्नाट होती."
सेटवर शाहरुख सलमान कसे असायचे? राकेश रोशन यांच्या खोलीबाहेर ते फटाके वाजवायचे का? यावर अशोक सराफ म्हणाले,"हो, ते दोघंही खूप मस्ती करायचे. पण मी त्यांच्यात नसायचो. कोणाला त्रास देणं मला पटत नाही. पण ते दोघं खूपच मजा मस्ती करायचे. त्यात त्यांच्याबरोबर जॉनी लिव्हर होते. जॉनी आणि मी एकदम चांगले मित्र होतो. त्यामुळे मग मीही जॉनीबरोबर असायचो."
शाहरुखसोबत 'येस बॉस'
शाहरुख खानबद्दल अशोक सराफ म्हणाले,"शाहरुख खान खूप मेहनती होता. तो असा सहज स्टार बनलेला नाही. त्यामागे त्याचे खरोखर खूप कष्ट आहेत. येस बॉस वेळी मी त्याला एक सजेशन दिलं होतं की या सीनमध्ये मजा येत नाहीये. त्यावर त्याने मला लगेच रिहर्सलला नेलं होतं. जोवर परफेक्ट होत नाही तोवर तो रिहर्सल करायचा. मला त्याचा हा स्वभाव खूप आवडतो. तो माणूसही खूप चांगला आहे."
शाहरुख-सलमान आता भेटत नाहीत
"आता ते दोघंही माझ्या संपर्कात नाहीत. आमचं भेटणं होत नाही. कारण त्यांचं काम वेगळं माझं काम वेगळं. मध्यंतरी एका इव्हेंटमध्ये सलमान भेटला होता. असंच एखाद्या कार्यक्रमात भेट होते एवढंच."