मनोरंजनसृष्टीत कास्टिंग काऊच हा शब्द अनेकदा ऐकण्यात येतो. अभिनेत्री असो किंवा अभिनेते अनेकांनी काम हवं असेल तर कॉम्प्रमाईज करावं लागेल असं सांगितलं जातं. काही लोक याविरोधात बोलतात कर काही निमूटपणे सहन करतात. मराठी तसंच साऊथ आणि हिंदी सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री संयमी खेरलाही (Saiyami Kher) एकदा हा अनुभव आला. विशेष म्हणजे तिला एका महिलेनेच कॉम्प्रमाईज करायला सांगितलं होतं असं ती म्हणाली.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत संयमी खेर म्हणाली, " मी १९ वर्षांची होते. तेलुगु सिनेमासाठी मला एका महिला एजंटचा फोन आला होता. 'कॉम्प्रमाईज' करावं लागेल असं ती मला म्हणाली. एक महिलाच असं सांगतेय हे ऐकून मला धक्काच बसला होता. मी म्हटलं, 'मॅडम, तुम्ही काय सांगताय मला कळत नाहीए'. ती तरी त्यावर जोर देत राहिली. शेवटी मी तिला स्पष्ट केलं की मी तशी मुलगी नाही जी काम मिळवण्यासाठी हा मार्ग स्वीकारेल. मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही."
ती पुढे म्हणाली, "सुदैवाने मला हिंदीत कधीच असा अनुभव आला नाही. मला ज्या ज्या संधी मिळाल्या त्यासाठी मी स्वत:ला नशिबवानच समजते. नंतर मी साऊथमध्येही ३ सिनेमे केले. नागार्जुन सरांसोबत काम करायला मिळालं. त्यामुळे मला एकदाच कास्टिंग काऊचचा असा अनुभव आला."
संयमीने रितेश देशमुखसोबत 'माऊली' या मराठी सिनेमात काम केलं होतं. याशिवाय ती 'मिर्झ्या','घुमर','अग्नी' यासह अनेक सिनेमांमध्ये दिसली.