Join us

वडील-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट! 'तू माझा किनारा' चित्रपटाचं पोस्टर पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:28 IST

वडील-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट! 'तू माझा किनारा' चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर,प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Tu Maaza Kinara Marathi Movie: कुटुंबातील नात्यांच्या भावनिक कंगोऱ्यांना स्पर्श करणारा आणि वडील-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट सांगणारा “तू माझा किनारा” या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

पार्श्वभूमीला समुद्राच्या लाटा, शांत वारा आणि त्यात दडलेला जीवनाचा किनारा या सगळ्यातून एका लहानग्या मुलीचा निरागस आणि गोड आवाज प्रेक्षकांना ऐकू येतो - "मला समुद्र किनारी यायला खूप आवडतं, कारण इथे बाबा, मुक्ता आणि आई आपण तिघेही एकत्र असतो..." या भावनिक वाक्यांसोबतच प्रभावी पार्श्वसंगीत प्रेक्षकांच्या मनाला भिडते आणि कथेतील आपलेपणा, ऊब आणि कुटुंबाची एकत्रता अधोरेखित करते. चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, वडील–मुलगी आणि कुटुंबाच्या नात्यांचं वास्तव आणि हळवं चित्रण मांडतो, याची झलक या मोशन पोस्टरमधून प्रभावीपणे दिसून येते.

लायन हार्ट प्रॉडक्शन्स प्रस्तुत “तू माझा किनारा” या चित्रपटाची जॉइसी पॉल जॉय यांनी निर्मिती केली असून सिबी जोसेफ व जॅकब जेव्हियर सह-निर्माते आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांनी केले आहे. या चित्रपटात केया इंगळे मुक्ताच्या मुख्य भूमिकेत येत आहे. चित्रपटाचे छायांकन एल्धो आयझॅक यांनी केले असून संकलनाची जबाबदारी सुबोध नारकर यांनी सांभाळली आहे. क्रिस्टस स्टीफन आणि संतोष नायर यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाचे संवाद चेतन किंजळकर तर कला दिग्दर्शन अनिल केदार यांनी केले आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत जॉर्ज जोसेफ यांनी दिले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सदानंद टेंबूलकर यांनी काम पाहिले असून हा हृदयस्पर्शी प्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

निर्मात्यांच्या मते, “तू माझा किनारा हा केवळ चित्रपट नाही, तर प्रत्येक घरातील वडील–मुलगी नात्याची जाणीव करून देणारा प्रवास आहे.”

टॅग्स :मराठी चित्रपटसोशल मीडिया