71st National Film Awards 2025: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. आज २२ सप्टेंबर रोजी या सर्व विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येसुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'श्यामची आई' साठी अमृता अरुणराव यांनी नऊवारी साडीत राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्राची लाडाची नऊवारी नेसून पुरस्कार स्वीकारत अमृता अरुणराव यांनी मराठमोळ्या संस्कृतीचा मान वाढवला. साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित 'श्यामची आई' ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. 'श्यामची आई'ने मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे.
'श्यामची आई' हा चित्रपट कृष्ण-धवल काळात घेऊन जाणारा हा सिनेमा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणार आहे. या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
शाहरुख खानला पहिला राष्ट्रीय पुरस्कार
बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान याला त्याच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मेसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला. तर अभिनेत्री राणी मुखर्जी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला.