Vijay Patkar: एखादा चित्रपट हिट झाला की त्याचे सीक्वलबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहते. या चित्रपटांच्या यादीत 'धमाल' चित्रपटाचं नव आवर्जून घ्यावं लागेल. कॉमेडीचा डबल डोस असलेल्या 'धमाल' सिनेमाचे आतापर्यंत तीन भाग आले आहेत. शिवाय चौथ्या भागाचीही प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. २००७ साली प्रदर्शित झालेला धमाल हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अभिनेता संजय दत्त, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, आशिष चौधरी यांसारखे नावाजलेले कलाकार धमालमध्ये पाहायला मिळाले. याशिवाय विजय पाटकर (Vijay Patkar), विजय राज, मनोज पाहवा, संजय मिश्रा, विनय आपटे यांनीही जीव ओतून आपापल्या भूमिका उत्तमरित्या निभावल्या. आजही या चित्रपटातले बरेचसे सीन प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. याच चित्रपटातील शेवटच्या विमानातील मजेदार सीनबद्दल अभिनेते विजय पाटकर यांनी किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांनी 'आरजेची शाळा' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यादरम्यान, 'धमाल' चित्रपटात विजय राज वैमानिकाला गाईड करतात तेव्हा एक विमान त्यांच्या केबिनच्या जवळून जाताना दिसते. तो सीन तर अगदी खराखुरा होता असं त्यांनी सांगितलं. शिवाय तो सीन शूट करताना मी घाबरलो होतो असं देखील ते म्हणाले. त्या सीनबद्दल बोलताना विजय पाटकर म्हणाले की, "विमान येताच विजय राज खाली पडतात तो सीन खरा घडलाय कारण त्या विमानात मी बसलेलो होतो. मी तर घाबरून पायलटला म्हटलं ही होतं की मला इथून जाऊ द्या. अजून जवळ, अजून जवळ असं मोटारबाकईसारखं तो ते विमान चालवत होता."
पुढे ते म्हणाले, "एकाचवेळी मी जमीन आणि आकाश दोन्हीही बघू शकत होतो इतका तो शॉट सुपरहिट झाला होता." असा मजेशीर किस्सा या मुलाखतीत विजय पाटकर यांनी शेअर केला.