Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कोण म्हणालं २७ वर्ष? आमच्यात केवळ...' सोनाली खरेने केला वयातील अंतराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 20:00 IST

सोनाली खरे आणि बिजय आनंद यांच्या वयात नेमकं अंतर किती?

मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) बरेच दिवसांनी पुन्हा सिनेमात दिसणार आहे. 'मायलेक' या सिनेमात ती भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यातील मायलेकीच पडद्यावरही भूमिका साकारताना दिसणार आहेत. सोनाली खरे आणि बॉलिवूड अभिनेते, योग शिक्षक बिजय आनंद यांची सनाया ही १५ वर्षीय मुलगी या 'मायलेक' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. दरम्यान सोनाली आणि बिजय (Bijay Anand) यांच्यात २७ वर्षांचं अंतर आहे असंच नेहमी सगळीकडे बोललं गेलंय. मात्र हे खोटं असल्याचं नुकतंच सोनालीने स्पष्ट केलंय.

'मायलेक' सिनेमाच्या निमित्ताने सोनाली अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. दरम्यान 'प्लॅनेट मराठीला' दिलेल्या मुलाखतीत सोनालीने तिच्या आणि नवऱ्यातील वयाच्या अंतराचा  खुलासा केला. ती म्हणाली, "मला खरंच  माहित नाही या चर्चा नेमक्या कशा सुरु झाल्या. मी सांगून सांगून थकले की हे खोटं आहे. आमच्यात २७ वर्षांचं अंतर वगरे काही नाही. बायका स्वत:चं वय सांगत नाहीत पण मी सांगते की माझा जन्म 1978 सालचा आहे आणि बिजयचा जन्म 1970 सालचा. त्यामुळे आमच्यात फक्त 8 वर्षांचं अंतर आहे."

ती पुढे म्हणाली, "नवरा-बायकोत 8 वर्षांचं अंतर असो किंवा त्यापेक्षा जास्त काहीही फरक पडत नाही. जर दोघांना आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ हवी असे तर त्यांच्यात जात, वय अशा गोष्टी आड येत नाहीत. तरी आमच्यातील वयाच्या अंतराबाबतीत जे काही येतंय ते सगळं खोटं आहे हे मी पुन्हा एकदा सांगतीये.'

सोनाली खरे 'चेकमेक', 'सावरखेड एक गाव' यासारख्या मराठी सिनेमांमध्ये झळकली आहे. बिजय आनंद यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिने काम करणं कमी केलं. तिला १५ वर्षांची सनाया ही मुलगी आहे जी सध्या १०वीत आहे.  सनायाने आईसोबत मायलेक सिनेमात काम केलंय. तसंच सोनालीने या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलंय.

टॅग्स :सोनाली खरेबिजय आनंदमराठी अभिनेतालग्नमराठी चित्रपट