मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) काही दिवसांपूर्वीच महाकुंभला हजेरी लावली होती. प्राजक्ता स्वत: खूप अध्यात्मिक आहे हे वेळोवेळी दिसलं आहे. तसंच ती शिवभक्तही आहे. तिने एकामागोमाग एक १० ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घेतलं. तर २ आठवड्यांपूर्वी तिने महाकुंभला हजेरी लावली होती. आता आगामी सिनेमांच्या प्रमोशनमध्ये तिने महाकुंभचा अनुभव सांगितला आहे.
प्राजक्ता माळी आगामी 'चिकी चिकी बुबूम बूम' मराठी सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. प्लॅनेटला मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिला महाकुंभचा अनुभव विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "मी तिथे गेल्यानंतर एका साधूंना भेटले. त्यांनी खूप छान माहिती दिली. ते म्हणाले की कोजागिरीला जसं आपण चंद्राला दूध दाखवतो मग पितो. कारण तिथे तेव्हा ते सगळे ग्रह तारे एकवटतात तो योग असतो. त्या योगाला तिथे त्रिवेणी संगमावर डुबकी घेणं याला खूप महत्व आहे. खरंच तिथे ती एनर्जी आहे जी मला पहिल्या डुबकीतच जाणवली."
ती पुढे म्हणाली,"माझा संगमामध्ये डुबकी घेतल्यानंतरचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. कारण सतत मंत्रोच्चार कानावर पडत असतो. हजारो लाखो साधू संत तिथे बसून ध्यान करत आहेत. जे तपश्चर्या आपापल्या ठिकाणी केलेली आहे ती एनर्जी घेऊन ते तिथे आलेले आहेत. मूळत: तिथे गंगा, यमुना, सरस्वतीचं संगम आहे. तो योगच आहे. १४४ वर्षांनी हे होतंय. त्यामुळे जी एनर्जी आहे ती सांगू शकत नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे."