Join us

'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो...'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 09:58 IST

Neha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत.

बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha pendse) हिची चर्चा रंगली आहे. उत्तम अभिनयासह बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या नेहाने अलिकडेच तिच्या नवऱ्याविषयी भाष्य केलं आहे. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

मराठीसह हिंदी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारी नेहा गेल्या काही काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. परंतु, सोशल मीडियावर ती कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या तिने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर आयुष्य कसं बदलतं हे तिने सांगितलं आहे.

"लग्न हे कधीच गुलाबांच्या पाकळ्यांसारखं नसतं. कोणतंही लग्न तडजोड केल्याशिवाय टिकत नाही. आणि, बऱ्याचदा लग्नानंतर केवळ स्त्रियांनाच तडजोड करावी लागते. माझं लग्न झाल्यानंतरही मीच तडजोड करते. तो काही करत नाही", असं नेहा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "पण तुम्ही ही तडजोड तेव्हाच करु शकता ज्यावेळी तुमचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असते. जेव्हा तुम्हाला समतोल राखता येतो तेव्हा एखाद्या स्त्रिला गोष्टी फार सोप्या होतात. मग त्यावेळी स्त्रियांना तडजोड करणं फारसं कठीण जात नाही. ठीक आहे तो करतोय ना, तो सांभाळून घेतोय ना..ठीक आहे..ठीक आहे..असं म्हणत आमचा साडेतीन वर्षांचा संसार अजूनही सुरु आहे."

दरम्यान, नेहाने २०२० मध्ये शार्दुल सिंग बायस याच्यासोबत लग्न केलं. शार्दुलचं हे तिसरं लग्न असून यापूर्वी २ वेळा त्याच घटस्फोट झाला आहे. त्याला दोन मुलीदेखील आहेत. नेहा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. नेहाने ‘प्यार कोई खेल नही’, ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :नेहा पेंडसेबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा