सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी लाखो भाविक मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात असतात. यंदाही पहिल्या दिवसापासूनच सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथ हिनेदेखील 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं.
'लालबागचा राजा'च्या चरणी मीरा नतमस्तक झाली. दर्शन झाल्यानंतर मीराने 'लालबागचा राजा'च्या दरबारातील काही फोटो शेअर केले आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी मीराने पारंपरिक लूक केला होता. "यावर्षी बाप्पाने मला ही शिकवण दिली की बाप्पा आपल्याला हवंय ते सगळं देत नाही. याचं कारण म्हणजे आपण त्याच्या लायक नसतो असं नाही. तर आपल्याला देण्यासाठी त्याच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी असतं", असं कॅप्शन मीराने या फोटोंना दिलं आहे.
मीरा जगन्नाथ ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्येही ती ओळखली जाते. मीराचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. बिग बॉस मराठीमुळे मीरा प्रसिद्धीझोतात आली होती.