Join us

"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:53 IST

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने महिला दिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत आहे (apurva nemlekar)

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने महिला दिनानिमित्त केलेली खास पोस्ट चर्चेत आहे. अपूर्वा लिहिते की, "महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मी एक स्त्री आहे याचा मला अभिमान वाटतो—साडी नेसणे, चांदीची दागिने घालणे, केस नीटसंवारणे, मेकअप करणे आणि माझ्या स्त्रीत्त्वाचा आनंद घेणे, हे सगळं मला खूप आवडतं."

"दरवेळी मी साडी नेसते, तेव्हा मला लहानपणीचे दिवस आठवतात—माझी आई, जी सरकारी अधिकारी होती, ती किती आत्मविश्वासाने तयार होत असे. तिच्या साडीची एकदम परफेक्ट पिनअप स्टाईल, तिच्या स्टार्च केलेल्या सुरेख कॉटन साड्या—एकही सुरकुती नाही—हे सर्व तिच्या शिस्तबद्ध आणि ताकदवान व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब होते. आजही, मी साडी नेसताना त्या आठवणींशी जोडली जाते आणि तिच्या शिकवणी, मूल्ये आणि नैतिकता मी माझ्यासोबत घेऊन चालते.""अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर नेहमीच टीका केली जाते—माझ्या अभिनयावर नाही, तर माझ्या शरीराच्या आकारावर. मला अनेकदा ‘ओव्हरसाईझड,’ ‘जाड,’ किंवा ‘कर्वी’ असे म्हटले जाते—जणू सौंदर्य केवळ एका विशिष्ट शरीररचनेतच बसते. सौंदर्याची तुलना केली जाते, एखाद्या ठरवलेल्या चौकटीत मला बसवण्याचा प्रयत्न केला जातो. लोक मला खाली खेचतात, पण मी हार मानत नाही. मी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत राहते—पण समाजाच्या कल्पनांप्रमाणे नाही, तर माझ्या स्वतःच्या निकषांवर."

"मी माझी ओळख स्वतः ठरवते. माझ्या शरीरावर, माझ्या कलागुणांवर आणि आत्मविश्वासावर मला पूर्ण विश्वास आहे, कोणाच्याही कल्पनेतील आदर्श शरीरयष्टीत बसण्याची मला गरज नाही. प्रत्येक स्त्रीला बॉडी शेमिंग सहन करावे लागते, पण तिची किंमत वजनाच्या काट्याने किंवा दुसऱ्यांच्या मतांनी ठरत नाही.एक स्त्री ही एकाच वेळी कोमल आणि ताकदवान असते—ती जगाचा भार आपल्या खांद्यावर उचलते, पण तरीही आत्मसन्मानाने पुढे चालत राहते."

"संकटांना एकटी सामोरी जाते, पण तिचा आत्मा कधीच कमकुवत होत नाही. समाज तिला परखतो, पण ती अजून जास्त चमकते, स्वतःची नवी वाट तयार करते. या महिला दिनी, प्रत्येक स्त्रीचा उत्सव साजरा करूया, जी आपली भावना स्वीकारते, पण त्याचवेळी ताकदीने उभी राहते. आपण सर्व जणी एकमेकींना प्रेरणा देत, सोबत उभ्या राहत आणि स्वतःच्या वेगळ्या प्रकाशात झळाळत राहूया."

टॅग्स :टेलिव्हिजनअपूर्वा नेमळेकरमराठीमराठी अभिनेताजागतिक महिला दिनमहिला