Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजही अमृता सुभाष वापरते स्मिता पाटील यांची 'ती' ओढणी; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:14 IST

Amruta subhash: स्मिता पाटील यांची ओढणी अमृताकडे कशी काय गेली? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (amruta subhash). आजवर मराठीसह हिंदी कलाविश्वातही अमृताने अनेक नावाजलेल्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे दिग्गज कलाकारांच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सध्या सोशल मीडियावर अमृताशी निगडीत एक किस्सा चर्चिला जात आहे.काही वर्षांपूर्वी अमृताने मामी फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची ओढणी परिधान केली होती. त्यामुळे स्मिता पाटील यांची ओढणी अमृताकडे कशी काय गेली असा प्रश्न अनेकांना पडला होता. याप्रश्नाचं उत्तरं अमृताने एका पोस्टच्या माध्यमातून दिलं. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम मामी फेस्टिव्हलचे काही फोटो शेअर केले होते. या पोस्टसोबत तिने स्मिता पाटील यांची ओढणी तिच्याकडे कशी काय आली हे सांगितलं.

काय आहे अमृता सुभाषची पोस्ट?

"आज स्मिताताई पाटील यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी महोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग... ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईने माझे अस्तु मधले काम पाहून मला दिली होती आणि सांगितलं होतं, तू जेव्हा या क्षेत्रात काम करणं थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल... ही भेट माझ्यासाठी अमूल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण काढत तिची ही ओढणी घेतली. तिच्यासारखं मोठं कुंकू लावून झुमके घालून या समारंभाला पोहचले. कार्यक्रम सुरू झाला आणि एक विलक्षण गोष्ट घडली. त्या बंद ऑडिटोरियममध्ये झगमगत्या दिव्यात एक सुंदर फुलपाखरू आलं. प्रेक्षकात उडायला लागलं. अनेकांना त्या ठिकाणी ते फुलपाखरू पाहून आश्चर्य वाटलं. थोडा वेळ उडून ते निघून गेलं. काहीच वेळात दीपिका पादुकोण आणि विशालजी भारद्वाजांनी दिप्ती नवल यांना पुरस्कार दिला. त्यावेळी दिप्तीदींच्या कामावर आधारित व्हिडीओ सुरू झाला आणि एका अवचित क्षणी स्मितादी आणि दिप्तीदिंचा फोटो पडद्यावर झळकला. माझे डोळे भरून आले," असं अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.हा फोटो अमृताच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून या फोटोवर ते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. ही ओढणी तुला मिळाली ही योग्यच गोष्ट आहे. तू त्या योग्यतेची असल्याचे तिच्या फॅन्सने तिला प्रतिक्रियांच्या मार्फत म्हटले आहे. 

दरम्यान, आज अमृता ओटीटी क्वीन या नावानेही ओळखली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून अमृता कलाविश्वात सक्रीय आहे. तिने अवघाचि संसार, झोका, पाऊल खूण या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, श्वास, सावली, हापूस, विहीर यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

टॅग्स :स्मिता पाटीलसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा