Tushar Ghadigaonkar Death: अलिकडेच मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर(Tushar Ghadigaonkar)ने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याचं सहकलाकाराकडून समजले. दरम्यान आता पोलिसांचा अहवाल समोर आला आहे.
तुषार घाडीगावकर ३४ वर्षांचा होता. त्याने २० जून रोजी रात्री राम मंदिर परिसरातील त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. "त्या वेळी तो घरी एकटाच होता. त्याची पत्नी घरी परतली तेव्हा त्याने दार उघडले नाही, त्यानंतर तिने शेजारी आणि पोलिसांना कळवले. दरवाजा तोडल्यानंतर आम्हाला तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभिनेता १ वर्षांपासून होता डिप्रेशनमध्येदरम्यान मिळालेल्या माहितीत पोलिसांना कळले की, तुषार गेल्या एक वर्षापासून डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. आमचा कोणावरही संशय नाही, असे त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिथक मुंबई नाट्यसंस्थेचं निवेदनमिथक मुंबई नाट्यसंस्थेने निवेदन प्रकाशित करत कुशल रंगकर्मी, दिग्दर्शक तुषार घाडीगांवकरने आत्महत्या कामाची कमतरता व आर्थिक अडचणीतून आणि दारूच्या नशेत केल्याच्या वृत्तांना फेटाळून लावलं आहे. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, २० जून २०२५ रोजी आपला स्नेही, सहकारी व कुशल रंगकर्मी, दिग्दर्शक तुषार घाडीगांवकर याचे दुखःद निधन झाले, ही अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना आहे. या अत्यंत संवेदनशील घटनेनंतर काही ऑनलाईन न्यूज पोर्टल्स व सोशल मीडियावर तुषारच्या आत्महत्येचे कारण ‘कामाची कमतरता’ व ‘आर्थिक अडचणीतून त्याने दारुच्या नशेत हे पाऊल उचलल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. मिथक नाट्यसंस्था अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचा तीव्र निषेध करते व अधिकृतरित्या या साऱ्या अफवांना स्पष्टपणे नाकारते.
सिनेइंडस्ट्रीवर पसरली शोककळा
तुषार घाडीगावकरच्या निधनाच्या वृत्तामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियावर त्याच्या निधनावर व्यक्त होत आहेत. अभिनेता तुषार घाडीगावकरने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्याने हिंदीतही काम केले आहे. तसेच काही जाहिरातींमध्येही तो झळकला होता. त्याने लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, उनाड , झोंबिवली, हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.