Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लहानपणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर...", एकनाथ शिंदेंचं कुशल बद्रिकेकडून कौतुक, म्हणतो- "घोडबंदरच्या खड्ड्यापासून ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:32 IST

कुशलने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक केलं आहे.

राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. १० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यंदाही गणेशोत्सवानिमित्त अनेक मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केलं होतं. मराठी अभिनेताकुशल बद्रिकेने त्याच्या पत्नीसह वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं. 

कुशलने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

एकनाथ शिंदेंसाठी कुशलची पोस्ट 

लहानपणी नागरिकशास्त्राच्या पेपरात एका मार्कासाठी हमखास येणारा प्रश्न म्हणजे, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?" त्या एका मार्कासाठी मुख्यमंत्र्यांना किती अभ्यास करावा लागतो बापरे… 

महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, ऋतू , अवकाळी पाऊस, गारपीट, खारे वारे, हंगामी वारे, त्यात मधेच सुटणारे “पॉलिटिकल वारे” सगळ्यांना तोंड द्यावे लागतं. 

गणपतीत आलेले हिंदी, मराठी “सितारे” यांना झेलावं लागतं. नुसती विकासाची कामे लक्षात ठेवून चालत नाही तर 'बाप्पाच्या आरत्या'सुद्धा पाठ असाव्या लागतात. 

घोडबंदरच्या खड्ड्यापासून ते हर्णे बंदरच्या खाडीला आलेल्या पुरापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात.

महाराष्ट्रात अचानक निर्माण होणाऱ्या कमी अधिक दाबाच्या पट्ट्याला सामोरं जावं लागतं...'राजकारणातल्या'सुध्दा... त्यात स्वतःच्या रक्तदाबाच्या पट्टयाकडे कायम दुर्लक्ष होतं.

मी ऑप्शनला टाकलेल्या त्या एका मार्काच्या प्रश्नाच्या उत्तराला मात्र ह्यातला एकही प्रश्न ऑप्शनला टाकता येत नाही!

असो, मला एवढेच म्हणायचंय की मा. एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत! तर माझा तेव्हाचा सुटलेला एक मार्क मला आता मिळेल काय?

कुशलने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेली ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :एकनाथ शिंदेकुशल बद्रिकेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता