Nagpur Violence: औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. काही समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये १५ पोलीस जखमी झाले आहेत. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. नागपुरात निर्माण झालेल्या या दंगल सदृश्य परिस्थितीनंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
हेमंत ढोमेने (Hemant Dhome) त्याच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तो म्हणतो, "नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती!कृपया शांतता आणि सलोखा जपा! ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा! ते बरळतील, आपण विचार सांगायचा! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा!".
नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर आता भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटलं आहे.