Join us

अंकुश चौधरीने शेअर केलेल्या 'या' फोटोमधील मराठी कलाकारांना ओळखलं का? सांगितली खास आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:48 IST

अंकुश चौधरीने शेअर केलेल्या या फोटोमधील मराठी कलाकारांना ओळखलं का? सांगितली खास आठवण (ankush chaudhary)

अंकुश चौधरी हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता. अंकुश चौधरीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अंकुश सोशल मीडियावर त्याच्या नव्या जुन्या सिनेमांबद्दलच्या आठवणी शेअर करताना दिसतो. अंकुशने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. याशिवाय हा फोटो शेअर करुन अंकुशने अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केलीय. 

अंकुश लिहितो, "'अशोक सराफ' हे नाव आमच्या संपूर्ण पिढीच्या आठवणींशी जोडलेलं आहे. त्यांच्या सिनेमांचे ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघणं हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. त्यांच्या विनोदी टाइमिंगवर फिदा होणाऱ्या लाखो प्रेक्षकांमध्ये मीही होतो आणि आजही आहे. त्यांचे डायलॉग्स, त्यांची स्टाईल, अभिनयातली सहजता, त्यातील बारकावे पाहिले, की वाटायचं हे असं आपल्यालाही जमायला हवं. म्हणूनच मी प्रेक्षक, अभिनेता आणि आता दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्याकडून खूप काही शिकत आलोय आणि अजूनही शिकतोय."

"माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५ मधे ‘सूना येती घरा’ या सिनेमात पहिल्यांदा अशोक सरांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी केवळ त्यांचा अभिनयच नाही, तर त्यांची सहजता, सेटवरील त्यांची ऊर्जा आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यानंतर ‘साडे माडे तीन’ च्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करता आलं. आणि आता २०२५ मधे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सिनेमासाठी आम्ही परत एकदा एकत्र काम केलंय.""राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा मोठा सन्मान आहे. पण त्यासाठी कमाल मेहनत आणि कायम दिलखुलास राहण्याची वृत्ती या गोष्टी सोप्या नसतात. पण अशोक सराफ हे नाव याला अपवाद आहे. अशोक सराफ सर, तुमच्या कला प्रवासाला सलाम! महाराष्ट्राच्या हृदयात आधीपासूनच तुमचं अढळ स्थान होतं. आज त्यावर ‘पद्मश्री’ ची मोहोर उमटली आहे. मनापासून अभिनंदन आणि खुप प्रेम!" दरम्यान अंकुशने जो फोटो शेअर केलाय तो 'सुना येती घरा' सिनेमातील आहे.अंकुशने शेअर केलेल्या 'सुना येती घरा' चित्रपटाच्या सेटवरील या फोटोत अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री अल्का कुबल याशिवाय अंकुश चौधरी, परी तेलंग,अर्चना नेवरेकर, महेश फडणीस, वैशाली साळवी हे कलाकार पाहायला मिळत आहेत. याच सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, रविंद्र बेर्डे, विजय चव्हाण हे कलाकारही होते.

टॅग्स :अंकुश चौधरीअशोक सराफअलका कुबलमराठी अभिनेतामराठी चित्रपट