Join us

"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:05 IST

Manisha Koirala on Nepal Protest: मनिषा कोईरालाने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या बूटाचा फोटो पोस्ट केला आहे.

नेपाळ देशात सध्या गंभीर परिस्थिती आहे. तेथील जेन झी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहे. आंदोलनाला हिंसक स्वरुपही प्राप्त झालं आहे. अशा परिस्थितीत तेथील सराकरही कोसळण्याची चिन्ह आहेत. नेपाळच्या गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. तेथील ही परिस्थिती पाहून मूळ नेपाळची असलेल्या अभिनेत्री मनिषा कोईरालाने (Manisha Koirala) पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

मनिषा कोईरालानेइन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या बूटाचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत तिने लिहिले, 'आज नेपाळसाठी काळा दिवस आहे. जेव्हा लोकांचा आवाज, भ्रष्टाचाराविरोधातील आक्रोश आणि न्यायाची मागणी याचं उत्तर बंदुकीच्या गोळ्यांमधून दिलं जातं." नेपाळमधील स्थिती पाहून मनीषा भावुक झाली आहे. 

मनीषा कोईरालाचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला. तिचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद हे नेपाळचे पंतप्रधान होते. तर तिचे वडील प्रकाश हे कॅबिनेट मंत्री होते. १९८९ मध्ये मनीषाने नेपाळी सिनेमा 'फेरी भेटौला'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तिला सुभाष घईंच्या 'सौदागर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. मनीषा नेपाळी मुलींची तस्करी रोखण्यासाठीही काम करते. 

नेपाळमध्ये झालं काय?

नेपाळमध्ये १८ ते २८ वयोगटातील तरुण मुलं रस्त्यावर उतरली. तेथील पंतप्रधान ओली सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याने सर्व तरुणाई आक्रमक झाली. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले, ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीचे प्रकार घडले. त्यात नेपाळ पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबारी केली, पाण्याचे फवारे वापरले. त्यात आतापर्यंत १९ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने सरकारची झोप उडवली.

टॅग्स :मनिषा कोईरालाबॉलिवूडनेपाळकाठमांडूमोर्चाइन्स्टाग्राम