Join us
Daily Top 2Weekly Top 5

Major movie review: प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा 'मेजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:33 IST

Major movie review: संदीप उन्नीकृष्णन यांचं साहस, देशसेवेसाठी त्यांनी दिलेली प्राणांची आहुती आणि एक खरा जवान म्हणून त्यांनी पार केलेलं कार्य पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो.

कलाकार: अदिवि शेष, सई मांजरेकर, शोभिता धुलिपाता, रेवती, प्रकाश राज

दिग्दर्शक:  शशी किरण टिक्का

श्रेणी: हिंदी, अॅक्शन मुव्ही,बायोग्राफी

कालावधी:  2 तास 28 मिनिटे

कलाविश्वात रुपेरी पडद्यावर असंख्य कलाकार आपण दररोज पाहतो. उत्तम अभियनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकारांना आज प्रत्येक जण स्टार, हिरो म्हणून ओळखतो. मात्र, जे देशासाठी आपलं बलिदान देतात, आपल्या कुटुंबापेक्षा देशातील जनतेसाठी कायम प्राण पणाला लावतात त्या रिअल लाइफ हिरोंविषयी सोशल मीडियावर फार कमी वेळा चर्चा होताना दिसते. आज प्रत्येकाला पडद्यावरील कलाकार सुपरहिरो वाटतो. मात्र, जो सीमेवर देशसेवेसाठी लढतो तोच खरा सुपरस्टार वा सुपरहिरो आहे. अशाच एका रिअल लाइफ हिरोवर  'मेजर' (Major) हा चित्रपट प्रदर्शित झाला.  26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात NSG च्या 51 जवानांनी त्यांचे प्राण गमावले. यात मेजर संदीर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर मेजर हा चित्रपट आधारित असून  या चित्रपटात त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे.

संदीप उन्नीकृष्णन यांचं साहस, देशसेवेसाठी त्यांनी दिलेली प्राणांची आहुती आणि एक खरा जवान म्हणून त्यांनी पार केलेलं कार्य पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. त्यामुळेच त्यांच्यावर आधारित चित्रपट करण्याची जबाबदारी दिग्दर्शक शशि किरण टिक्का यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी ही जबाबदारी लिलया पार पाडली असून हा चित्रपट प्रदर्शित होताच लोकप्रिय ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

मेजर या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अर्थात तेलुगू अभिनेता अदिवि शेष याने मुख्य भूमिका साकारली आहे.  26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढा देत असताना ते शहीद झाले. त्यामुळे या हल्ल्यासह या चित्रपटात त्यांचं बालपण, वैवाहिक जीवन या सगळ्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे एक मेजर पलिकडे त्यांचं कौटुंबिक आयुष्य कसं होतं हे देखील उत्तमरित्या या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. परंतु, हा चित्रपट पाहात असताना कोणत्याही प्रेक्षकांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाही.

मेजर संदीप यांना बालपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. परंतु, एक सैनिक, जवान होणं वाटतं तितकं सोपं नाही. या क्षेत्रात अनेक अडचणी आणि प्राणांची आहुती द्यावी लागते हे त्यांच्या आई-वडिलांना माहित होतं. त्यामुळे मुलाचा हा निर्णय त्यांना मान्य नव्हता. मात्र, देशप्रेमाने भारावून गेलेल्या संदीप यांनी सैन्याशिवाय अन्य कोणतंही क्षेत्र मान्य नव्हतं. त्यामुळे आई-वडिलांचं न ऐकता ते सैन्यात भरती झाले होते. परंतु, सैन्यात भरती होऊन त्यांनी वेळोवेळी त्यांचं देशप्रेम दाखवून दिलं. 26/11 च्या वेळी मोठ्या चतुराईने मेजर संदीप ताज हॉटेलमध्ये शिरले आणि हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुपपणे सुटका केली.

कसं आहे चित्रपटाचं दिग्दर्शन?

दिग्दर्शक शशी किरण टिक्का यांनी अप्रतिमरित्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या काळजाला भिडतो. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक सीन पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. तसंच या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेली मेहनतदेखील दिसून येत आहे. या चित्रपटात अनेक अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

 या चित्रपटामध्ये मेजर संदीप यांची भूमिका अदिवि शेष याने साकारली आहे. तसंच त्याच्यासोबत प्रकाश राज, रेवती, सई मांजरेकर हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटात सईने इशा ही भूमिका साकारली असून रेवती व प्रकाश राज यांनी मेजर संदीप यांच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे.

मेजर संदीप यांची उल्लेखनीय कामगिरी

मेजर संदीप यांनी 26/11 सह कारगिल युद्धात ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेश रक्षक यासारखे अनेक मिशन फत्ते केले आहेत. 

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटीसई मांजरेकर