Join us

पुन्हा एकदा ओम् फट स्वाहा! तात्याविंचू परत येणार; 'झपाटलेला ३' सिनेमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 18:25 IST

'झपाटलेला ३' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

९०च्या दशकातील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'झपाटलेला' हा चित्रपट. नुसतं तात्याविंचू हे नाव काढलं तरी लहान मुलांचा थरकाप उडायचा. ओम् फट स्वाहा असं म्हणत येणारा तात्याविंचू पाहिला की घाबरगुंडी उडायची. बॉलिवूड काय तर हॉलिवूडलाही तोडीस तोड असा होता १९९३ साली प्रदर्शित झालेला 'झपाटलेला'. महेश कोठारेंचं दिग्दर्शन आणि लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. नुकतीच या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. 

'झपाटलेला' सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्सुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर २०१३ साली या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता. 'झपाटलेला २'मध्ये आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. आता तब्बल १० वर्षांनी 'झपाटलेला' सिनेमाच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'झपाटलेला ३' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'झपाटलेला ३' सिनेमात आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत असणार आहे. महेश कोठारे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 'झपाटलेला' मी तात्या विंचू असं सिनेमाचं नाव असून पुन्हा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी तात्या विंचू सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर कपाळावर गोळी लागलेला तात्या विंचू आणि आदिनाथ कोठारे दिसत आहेत. २०२५मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :आदिनाथ कोठारेमहेश कोठारेमराठी चित्रपट