आतापर्यंतची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून आजही मधुबालाचं (Madhubala) नाव आवर्जुन घेतलं जातं. ५० ते ६० च्या दशकात मधुबालाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना वेड लावलं होतं. कित्येक अभिनेतेही तिच्यामागे वेडे होते. मधुबालाने मात्र किशोर कुमारशी लग्न केलं होतं. तरी मधुबालाला 'ट्रॅजेडी क्वीन' असंही म्हटलं जातं. कारण वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला होता. तिच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये किशोर कुमार यांनी तिच्याकडे कायम दुर्लक्षच केलं असा खुलासा मधुबालाची बहीण मधुर भूषण (Madhur Bhushan)यांनी नुकताच केला आहे.
'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत मधुर भूषण म्हणाल्या, "मधुबालाला हृदयाचा विकार होता. तिच्या हृदयात छिद्र आहे आणि आता ती २ वर्षच जगू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ते ऐकून वडिलांनी आता तू किशोरसोबत लग्न करु नको असा सल्ला दिला होता. मात्र १९६० मध्ये तिने किशोर कुमारशी लग्न केलंच. किशोरने तिला लंडनला उपचारासाठी नेलं. मात्र तिथेही तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. ती दोनच वर्ष जगेल असं तेही म्हणाले."
त्या पुढे म्हणतात, "किशोर कुमार यांनी नंतर तिला पुन्हा वडिलांकडे आणून सोडलं. 'मी कामात व्यस्त असणार, सतत प्रवासात असणार मी तिच्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. मी माझे पूर्ण प्रयत्न केले, लंडनलाही घेऊन गेलो. डॉक्टरच असं सांगत असतील तर माझी काय चूक? असं ते म्हणाले.' आम्ही असं म्हणत नाही की किशोर चुकीचे होते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की ती शारिरीक संबंध ठेऊ शकत नाही आणि मुलांनाही जन्म देऊ शकत नाही. मात्र एक स्त्री म्हणून मधुबालाला भावनिक आधाराची गरज होती. तिला किशोर कुमार यांच्याजवळच राहायचं होतं. किशोर यांनी बांद्रा येथे एक फ्लॅट घेतला आणि तिथे तिला ठेवलं. मात्र ते तिला तीन महिन्यात एकदा कधीतरी भेटायला यायचे. ती खूप एकटी पडली होती. साहजिकच त्या वयात तिला इर्षाही वाटायची. डॉक्टरांनी २ वर्ष सांगूनही ती पुढे ९ वर्ष जगली होती. एकटेपणामुळेच तिचा मृत्यू झाला. "
मधुबाला यांनी वयाच्या ८ व्या वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी 'नील कमल','अमर','महल','चलती का नाम गाडी','हाफ तिकीट','मुघल ए आजम' यासह अनेक हिट सिनेमे दिले. सुरुवातीला त्यांचं नाव दिलीप कुमार यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. मात्र ते फार काळ टिकलं नाही आणि नंतर ती किशोर कुमारच्या प्रेमात पडली.