Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bharti Singh: 'हिचं लग्न होणार नाही'; भारतीसह तिच्या आईला नातेवाईकांनी टाकलं होतं वाळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 12:58 IST

Bharti singh: भारती कलाविश्वात येणारे तिच्या घरातल्यांना कळताच कुटुंबियांनी तिला आणि तिच्या परिवाराला वाळीत टाकलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी खुलासा केला.

आजवर कलाविश्वात प्रेक्षकांना हसवणारे असंख्य विनोदवीर प्रेक्षकांनी पाहिले आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये एका लाफ्टर क्वीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या विनोदबुद्घीच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली लाफ्टर क्वीन म्हणजे भारती सिंह (bharti singh). आज भारती तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या तिच्याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. यामध्येच तिची स्ट्रगल स्टोरीही चर्चेत आली आहे.

पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या भारतीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. २००८ मध्ये शोबिज की दुनिया या कार्यक्रमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आणि आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली.परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. भारती कलाविश्वात येणारे तिच्या घरातल्यांना कळताच कुटुंबियांनी तिला आणि तिच्या परिवाराला वाळीत टाकलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी खुलासा केला.

राजीव खंडेलवालच्या चॅट शोमध्ये भारतीने तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली. "मी २ वर्षांची असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईवर आली. त्यावेळी माझ्या आईचं वय केवळ २२ वर्ष होतं. आईचं कमी वयात लग्नात झाल्यामुळे तिला बरेच कष्ट सहन करावे लागले.मी बऱ्याचदा आईसोबत घरकाम करायला जायचे", असं भारती म्हणाली. तसंच 'इंडियाज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमातही तिने तिच्यावर ओढावलेल्या परिस्थितीविषयी सांगितलं. त्यांना घरातल्यांनीच कसं वाळीत टाकलं हे तिने सांगितलं.

पुढे ती म्हणते, "रिअँलिटी शोसाठी माझी निवड झाल्यानंतर मी मुंबईला येण्यासाठी निघाले होते. त्यावेळी माझ्या कुटुंबियांनीच मला वाळीत टाकलं. हिचे वडील नाहीयेत तरी ही हे काय काम करतीये? हिचं तर लग्न सुद्धा होणार नाही. मुंबईत जाणाऱ्या मुलींचं काय होतं हे सगळ्यांनाच ठावूक असं म्हणतं नातेवाईकांनी मला आणि माझ्या आईला वाळीत टाकलं होतं."

दरम्यान, अनेक हालअपेष्टा सहन केल्यानंतर भारतीने तिचं करिअर घडवलं. आज भारती लोकप्रिय लाफ्टरक्वीन म्हणून ओळखली जाते. भारतीने हर्ष लिंबाचियासोबत लग्न केलं असून त्यांना एक लहान मुलगादेखील आहे.

टॅग्स :भारती सिंगटेलिव्हिजनटिव्ही कलाकार