Join us

लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट फोन करून म्हणालेल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:07 IST

लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट केलेलं असं काही की...

Vishakha Subhedar Talk About Lata Mangeshkar: आपल्या अनेक  सदाबहार आणि सुपरहिट गाण्यांनी संगीतविश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या लता मंगेशकर यांना न ओळखणारा सिनेरसिक सापडणं कठीण आहे. आपल्या आयुष्यातील ७० वर्षे त्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात होत्या. त्यांनी गायलेला प्रत्येक सूर रसिकांच्या कानात व मनात कायमचा साठवलेला आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्‍न' प्राप्त होणार्‍या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्‍या गायिका आहेत. लता मंगेशकर चाहतावर्ग जगभरात आहे.परंतु,तुम्हाला माहितीये का? आपल्या आवाजानं चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींना टीव्हीवरील लोकप्रिय असणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या फॅन होत्या. असा खुलासा अभिनेत्रीने विशाखा सुभेदारने केला आहे.

नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री विशाखा सुभेदाराने याबद्दल खुलासा केला आहे.महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील विशाखाचं काम पाहून लतादीदींनी चक्क तिला फोन करुन तिचं तोंडभरून कौतुक केलं होतं. शिवाय विशाखाला सुभेदारला भेट म्हणून दोन साड्या देखील दिल्या होत्या.या मुलाखतीत तो किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली,"लताबाईंनी मला एकदा भेट म्हणून साड्या पाठवल्या होत्या. एक निळ्या रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची साडी  अशा दोन साड्या त्यांनी मला पाठवल्या होत्या. त्यांना ते माझं हास्यजत्रेतील उर्दू भाषेतील स्किट खूप आवडलं होतं.त्यावेळी लतादीदी माझ्यासोबत १९ मिनिटं फोनवर बोलल्या.तो क्षण माझ्या कायम स्मरणात राहिल. तेव्हा समीर पण माझ्यासोबत तिथे होता आणि त्या बोलत होत्या. फोनवर त्या सांगत होत्या,'तू ज्या पद्धतीने उर्दू बोललीस ते फार उत्तम होतं. हे फार कमी लोकांना जमतं.मी इतकी वर्ष गातीये तरीही मला उर्दू बोलताना टेन्शन येतं."

यानंतर पुढे विशाखा म्हणाली, "मग त्यावेळेस त्यांनी माझा पत्ता घेऊन ठेवला. त्यानंतर लतादीदींनी मला खास भेटवस्तू पाठवली. त्यावर त्यांची सही आणि दोन पेशवाई सिल्क साड्या त्यांनी मला पाठवल्या. त्या १९ मिनिटांमध्ये लतादीदी इतक्या भरभरुन बोलल्या की, मी सुद्धा लहानपणी नाटकात काम केलंय असे अगदी त्यांच्या लहानपणाचे किस्से त्या सांगत होत्या.आपण ऐरवी त्यांची गाणी ऐकतो ही गोष्ट निराळी आहे. पण, प्रत्यक्षात त्यांचा आवाज फोनवर ऐकणं हा अनुभव माझ्यासाठी छान होता." असं म्हणत विशाखा सुभेदारने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, मराठी मालिका, चित्रपट  आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमावर अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा नंतर तिने रंगभूमीकडे आपला मोर्चा वळवला. त्याचबरोबर स्टार प्रवाहवरील शुभविवाह या मालिकेतही तिने खलनायिकेची भूमिका साकारली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lata Mangeshkar was a fan of 'Maharashtrachi Hasyajatra'!

Web Summary : Vishakha Subhedar revealed Lata Mangeshkar enjoyed 'Maharashtrachi Hasyajatra,' even calling to praise her performance. Mangeshkar sent Subhedar two sarees as a gift and cherished their conversation, praising her Urdu delivery.
टॅग्स :लता मंगेशकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीमहाराष्ट्राची हास्य जत्रा