Join us

'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या "महाराष्ट्राची विशेष ओळख..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:44 IST

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम प्राची शाह यांनी मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादावर ठाम भूमिका मांडली आहे.

Prachi Shah on Hindi Marathi Row: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. केंद्र सरकारच्या नवीन शालेय शिक्षण धोरणात हिंदी भाषेला सक्तीने स्थान दिल्यामुळे राज्यात विरोधाची लाट उसळली होती. या निर्णयावर शिक्षण क्षेत्रापासून ते राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रापर्यंत अनेकांनी आवाज उठवला.  त्यानंतर हिंदी सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला. पण, यानंतर मराठी विरुद्ध हिंदी असा वाद वाढला आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकली जावी, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धरला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानाला उत्तर भारतीय नेत्यांकडून आव्हान दिलं जातंय. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राची शाह यांनीही आपली ठाम भूमिका मांडली आहे.

प्राची शाह यांनी नुकतंच 'व्हायरल बॉलीवूड' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, "मी महाराष्ट्रीयन आहे. माझी आई महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे मला मराठी खूप चांगलं येतं. मी पुण्याची आहे. मराठी ही माझ्या खूप जवळची भाषा आहे आणि ती कायमच राहील. कारण माझी मातृभाषासुद्धा मराठी आहे".

एकजुटीचा संदेश देत त्या म्हणाल्या, "मला असं वाटतं की, आपण सगळे एक आहोत आणि हे आपण कायमच लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यांमध्ये आपलेपणाची एक प्रेमळ भावना आहे आणि ती असलीच पाहिजे". प्राची शाह पुढे म्हणाल्या, "प्रत्येक भाषेची एक वेगळी ओळख आहे. तसंच प्रत्येक एका शहराचं आणि राज्याचंसुद्धा वैशिष्ट्य आहे. प्रत्येक राज्याच्या संस्कृतीला महत्त्व मिळालं पाहिजे. प्रत्येक क्षेत्राची, प्रांताची वेगळी ओळख असते. तशी महाराष्ट्राची विशेष ओळख ही मराठी आहे". मराठी भाषेविषयी अभिनेत्री प्राची शाह यांनी दिलेली ही प्रतिक्रिया मराठी भाषाप्रेमींना दिलासा देणारी आहे. 

 

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीहिंदीमहाराष्ट्रमनसे