अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) युट्यूबच्या जगात 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने प्रसिद्ध आहे. तर बिग बॉस मराठीमुळे ती आता घराघरातही पोहोचली आहे. अंकिता येत्या १६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. संगीतकार कुणाल भगतसोबत ती लग्न करत आहे. नुकतंच दोघांनी प्री वेडिंग फोटोशूट केलं. देवबागच्या समुद्रकिनारचीच सुंदर जागा त्यांनी यासाठी निवडली. मात्र हे प्री वेडिंग इतर फोटोशूटपेक्षा खूप वेगळं आहे. ते कसं वाचा.
अंकिता वालावलकरच्या आई वडिलांचं देवबागला रिसॉर्ट आहे. तर तिला दोन बहिणीही आहेत. तिचं कुटुंबावर किती प्रेम आहे हे तर आपण तिच्या सोशल मीडियावरुन बघतोच. मात्र हे प्रेम तिच्या प्री वेडिंग व्हिडिओमधूनही दिसलं आहे. इतर जोडपे प्री वेडिंग करताना काहीतरी विशिष्ट थीम घेतात, सारख्याच रंगाचे कपडे घालतात आणि सुंदर ठिकाणी छान फोटो काढतात. पण अंकिताने एक वेगळा ट्रेंड सुरु केला. तिच्या प्री वेडिंग व्हिडिओमध्ये तिचे आई वडील आणि बहिणीही आहेत. तिचे आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मुलींना वाढवलं, शिकवलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अंकिता आणि कुणाल नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. म्हणूनच प्री वेडिंग व्हिडिओ आईवडील आणि बहिणींशिवाय पूर्ण होणारच नाही. मरुन रंगाच्या लाँग वनपीसमध्ये अंकिता सुंदर दिसतीये. ना फार मेकअप ना जास्तच वेस्टर्न वेषभूषा अगदी साध्या लूकमध्ये ती जशी आहे तशीच ती या दिसत आहे. तर कुणालही त्याच्या कॅज्युअल लूकमध्ये दिसतोय. लहानपणीचे खेळ, एकत्र बसून जेवण, समुद्रकिनारी मजा-मस्ती असे प्रसंग यामध्ये कैद करण्यात आलेत. तसंच या व्हिडिओसाठी स्वत: कुणालनेच गाणं लिहिलं आणि कंपोजही केलं आहे. 'पाहत राहावे' असं गाण्याचं नाव आहे. अंकिताने व्हिडिओ शेअर करत छान प्रेरणादायी कॅप्शन लिहिलं आहे.
ती लिहिते, "सुरुवातीला कुठे होतं ओ प्रीवेडिंग पण लग्न टिकलीच ना? आत्तापेक्षा तरी जास्तच…सगळ्याच गोष्टी इतरांसारख्या केल्या तरचं आपल्याला समाजात स्थान मिळेल अस नाही…आयुष्य ज्या व्यक्तीसोबत घालवणार त्या व्यक्तीसोबतच photoshoot म्हणजे प्रीवेडिंग नव्हे तर आपल्या मनात असलेल्या सगळ्या अपुर्ण गोष्टी पुर्ण करण आणि नवीन आयुष्याकडे वळणं हे खरं प्री वेडिंग… इतर लोक जे करतात ते आपण फक्त पाहत राहावे……मी अस म्हणणार नाही की तुम्ही हेच करा पण करून बघायला काय हरकत आहे? बाकी कसं वाटल माझं प्री वेडिंग???"
तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. 'प्री वेडिंग असावं तर असं','खूप छान अंकिता','सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आणि खूप सुंदर' अशा अनेक कमेंट्सचा अंकिता-कुणालच्या प्री वेडिंगवर व्हिडिओवर वर्षाव झाला आहे.