Join us

KK Funeral: 'व्हॉईस ऑफ लव्ह' केके अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:46 IST

KK Funeral: सर्वांचा लाडका गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याचं मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्याच्यावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

KK Last Rites : सर्वांचा लाडका गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) याचं मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्याच्यावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केकेच्या मुलाने वडिलांना मुखाग्नी दिला.मुंबईतील निवासस्थानावरून केकेची अंत्ययात्रा निघाली. शेकडो चाहत्यांनी आपल्या लाडक्या गायकाला डबडबलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. त्याआधी केकेचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्याचं अंत्यदर्शन घेतलं.

गायक  अभिजित भट्टाचार्य, श्रेया घोषाल, जावेद अली, सलीम मर्चंट यांच्यासह केके यांचे अनेक मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकार केकेला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले होते.  केकेच्या अंत्ययात्रेत चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या अखेरच्या प्रवासात ‘केके अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.

मंगळवारी संध्याकाळी कोलकात्यातील एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेला अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर काही तासांनी त्याची प्रकृती बिघडली. त्याला रूग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. या प्रकरणामध्ये  कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं.  केकेच्या डोक्यावर आणि चेहºयावर जखमेच्या खुणाही आढळल्या असल्यानं त्याच्या मृत्यूबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या. मात्र शवविच्छेदन अहवालात केकेचा मृत्यू  हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. केकेच्या यकृत व फुफ्फुसांची स्थिती फारशी चांगली नव्हती, असंही या अहवालातून स्पष्ट झाल्याचं कळतंय.

 केके याचा जन्म दिल्लीमध्ये  जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये त्यानं शिक्षण घेतलं.  ग्रॅज्युएशननंतर केकेनं मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली आणि पण यानंतर संगीतक्षेत्रात त्याने स्वत:ला झोकून दिलं.  1999 मध्ये ‘ पल’ नावाचा त्याचा पहिला अल्बम रिलीज झाला.

 प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केकेला बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली होती. ‘माचीसा चित्रपटामधील छोड आये हम... हे त्याचं गाणं तुफान गाजलं होतं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या  हम दिल चुके सनम   या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के...’ या केकेच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.   हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. 

टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथबॉलिवूडसंगीत