अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आगामी दाक्षिणात्य सिनेमा 'गेम चेंजर' मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिने सुपरस्टार रामचरण तेजासोबत स्क्रीन शेअर केली आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. चाहत्यांनी ट्रेलरला खूप प्रतिसाद दिला. दरम्यान सततच्या व्यस्त शेड्युलमुळे कियारा तब्येत अचानक बिघडली. ती आज सिनेमाच्या प्रमोशनमध्येही दिसली नाही. तसंच ती रुग्णालयात दाखल झाल्याच्या चर्चाही झाल्या. मात्र तिला घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
काही मिडिया रिपोर्ट्सने कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याचं सांगितलं. मात्र नंतर कियाराच्या टीमकडून स्पष्टीकरण आलं. माहितीनुसार, 'कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही. व्यस्त शेड्युलमुळे आलेल्या थकव्यामुळे तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सलग कामच करत आहे यासाठी तिला आता रेस्ट घेण्यास सांगण्यात आलं आहे."
कियारा आज रामचरण तेजासोबत प्रेस मीटमध्ये सहभाग घेणार होती. मात्र ती यासाठी उपस्थित राहिली नाही. तब्येतीच्या कारणामुळेच ती हजर राहू शकली नाही. बिग बॉस १८ च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये कियाराला पाहिलं गेलं. तिने स्पर्धकांशी संवाद साधला. शोच्या सेटवरील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
कियारा आणि रामचरण तेजाचा 'गेम चेंजर' १० जानेवारी रोजी रिलीज होत आहे. यानंतर कियारा हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरसोबत 'वॉर २' मध्येही झळकणार आहे.