Jaya Bachchan: समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन पुन्हा संसदेत संतापलेल्या पाहायला मिळाल्या. राज्यसभेत २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना जया बच्चन थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सुनावलं आहे. चित्रपट इंडस्ट्रीबद्दल बोलताना त्या आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्यात. बॉलिवूडला जिवंत ठेवण्यासाठी पाऊल उचलावीत, अशी विनंती जया बच्चन यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना केली आहे.
चित्रपट उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केलाय. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे जगणे कठीण झाल्याचं त्यांनी म्हटलं जया बच्चन म्हणाल्या की, "आधीच्या सरकारनेही चित्रपट उद्योगाकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु यावेळी सरकारने ते एका नवीन पातळीवर नेलं आहे. चित्रपट उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. सरकार केवळ स्वतःच्या उद्देशासाठी चित्रपट उद्योगाचा वापर करतं", असा आरोपही त्यांनी केला.
जया बच्चन म्हणाल्या, "सर्व सिंगल स्क्रीन बंद होत आहेत. सर्व काही महाग झाल्यामुळे लोक थिएटरमध्ये जात नाहीत. कारण सगळं महाग झालं आहे". पुढे त्या म्हणाल्या, "कदाचित आजचे सरकार या उद्योगाला पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहे. चित्रपट इंडस्ट्री हा असा एकमेव उद्योग आहे, जो संपूर्ण जगाला भारताशी जोडून ठेवतो".
संसदेत जया बच्चन यांनी सिनेमाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, "मी माझ्या चित्रपट इंडस्ट्रीच्या वतीने आणि ऑडियो-व्हिजुअल इंडस्ट्रीच्या वतीने बोलत आहे. सभागृहाला विनंती आहे की, कृपया फिल्म इंडस्ट्रीला सोडून द्या. थोडी दया दाखवा. फिल्म इंडस्ट्री नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. मी अर्थमंत्र्यांना विनंती करते की, त्यांनी याचा विचार करावा आणि या इंडस्ट्रीला टिकवून ठेवण्यासाठी पाऊल उचलावीत".