Jaya Bachchan on Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. कुणाल कामरा याने मुंबईतील एका शोमध्ये "गद्दार नजर वो आए..." या विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर टिप्पणी केली. यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी थेट ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये जाऊन तोडफोडही केली. सध्या हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. यावरुन समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय.
जया बच्चन यांनी एएनआयशी बोलताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? असा सवाल केला. "जर अशा प्रकारे बोलण्यावर बंधन लागली, तर काय होईल. अशीही माध्यमे वाईट अवस्थेत आहेत, त्यांच्यावर बंधन आहेत", असं त्यांनी म्हटलं. त्या म्हणाल्या, "उद्या माध्यमांना म्हणतील, हीच बातमी घ्या, ही घेऊ नका. जया बच्चन यांची मुलाखत घेऊ नका. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? फक्त मारामारी करण्याचं स्वातंत्र्य आहे. विरोधकांना मारहाण करणे, महिलांवर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे. आणखी दुसरे काय?". पुढे एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्या म्हणाल्या, "तुम्ही खरा पक्ष सोडला आणि सत्तेसाठी दुसरा पक्ष स्थापन केलात. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?", असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणाता आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. कुणाल कामराने माफी मागायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना शिंदे गट कुणाल कामराविरोधात आक्रमक झाला आहे. कुणाल कामरा हा संजय राऊतचा खास मित्र असून त्याच्या स्टुडिओसाठी मातोश्रीकडून पैसे देण्यात आले. संजय राऊत आणि उबाठाच्या सांगण्यावरुन कामराने विकृत गाणे केले, असा दावा शिंदेसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांनी कुणाल कामराच्या टीकेचे कौतुक केलं आहे.