Join us  

घरावर झालेल्या गोळीबारानंतर सलमान सोडणार गॅलेक्सी अपार्टमेंट?; अरबाजने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:50 AM

Salman khan: काही दिवसांपूर्वीच सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर २ अज्ञातांनी गोळीबार केला.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (salman khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणातील गोळीबार करणाऱ्या  चार लोकांना अटकदेखील करण्यात आली आहे. सोबतच सलमानच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील सलमानच्या कुटुंबीयांना सातत्याने त्याच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. यामध्येच आता सलमानच्या जीवाला धोका असल्यामुळे तो गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी नुकतीच अभिनेता आणि सलमानचा भाऊ अरबाज खान (arbaaz khan) याने भाष्य केलं आहे. सोबतच सलमान गॅलेक्सी सोडून दुसरीकडे रहायला जाणार का हेदेखील त्याने सांगितलं आहे.

अलिकडेच अरबाजने 'झूम'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराविषयी भाष्य केलं. "सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर तो गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसरीकडे रहायला जाणार असल्याचं म्हटलं जातंय. ते खरं आहे का?" असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. त्यावर, अरबाजने उत्तर दिलं.

सलमान सोडणार गॅलेक्सीमधील घर?

"तुम्हाला काय वाटतं हे केल्यानंतर सगळं सुरळीत होणार आहे का? जागा बदलल्यानंतर  जे घडलंय ते पुन्हा घडणार नाही असं वाटतं का? ही काही लहानशी धमकी नव्हती की पुन्हा मिळणार नाही. जर असं असतं तर जागा बदलता आली असती. पण, आता जे झालंय त्यात हे शक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही सतत जागा बदलत राहणार की मग त्यापेक्षा जास्त सतर्क आणि काळजी घेणार?", असं अरबाज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझे वडील बरीच वर्ष त्या घरात राहिले आहेत. सलमान सुद्धा कित्येक वर्षांपासून याच घरात राहतोय. हे त्याचच घर आहे. जर हे घर सोडलं तर आम्ही तुला सोडू असं कोणी म्हणत नाहीये. त्यामुळे या परिस्थितीत एकच करता येईल की पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल आणि पूर्वीसारखंच नॉर्मल आयुष्य जगा. जर तुम्ही सतत भीतीच्या छायेखाली राहिलात तर कधीच घराच्या बाहेर पडू शकणार नाही."

दरम्यान, सलमान त्याचं नॉर्मल आयुष्य जगायचा प्रयत्न करत आहे. नुकताच त्याचा  'टायगर 3' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत झळकले होते. लवकरच सलमानचा सिकंदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानअरबाज खानसेलिब्रिटीसिनेमा