बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या भीषण हिंसाचार आणि जाळपोळीमुळे जग हादरलं आहे. बांगलादेशात अनेक लोकांची हत्या करण्यात आली. त्यामुळे या भयंकर परिस्थितीत अनेक नागरिकांना जीव मुठीत ठेऊन जगावे लागत आहे. बांगलादेशात झालेल्या या हिंसाचाराचा फटका एका प्रसिद्ध भारतीय गायकाला बसला. स्वतःची ओळख लपवून या गायकाला अक्षरशः तिथून पळ काढून भारतात यावं लागेल. काय घडलं नेमकं?
कोलकाता येथील प्रसिद्ध सरोद वादक शिराज अली खान यांना बांगलादेश हिंसाचाराचा भयंकर अनुभव आला आहे. ढाका येथे एका संगीत कार्यक्रमासाठी शिराज अली खान गेले होते. तेव्हा तिथे झालेली जाळपोळ आणि हिंसाचाराच्या कोंडीत ते सापडले. अखेर आपली 'भारतीय ओळख' लपवून तेथून पळ काढत त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला आणि मायदेशी परतले आहेत.
नेमकी घटना काय?
शिराज अली खान यांचा १९ डिसेंबर रोजी ढाका येथील 'छायानाट' या सांस्कृतिक केंद्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात होता. मात्र, कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी याच्या निधनानंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला. ज्या केंद्रात शिराज यांचा कार्यक्रम होणार होता, तिथे जमावाने प्रचंड तोडफोड केली. ही परिस्थिती पाहून शिराज अली खान भयभीत झाले. शनिवारी संध्याकाळी तेथून निघताना त्यांना संतप्त जमावाचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी आपण 'भारतीय' असल्याचे लपवून ठेवले आणि कशाबशा प्रकारे कोलकाता गाठले.
शिराज अली खान सुखरूप परतले असले तरी, त्यांच्यासोबत गेलेला तबला वादक अद्याप बांगलादेशातच अडकलेला आहे. तो सुखरूप परत यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिराज यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, "मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की मला माझी ओळख लपवून पळावे लागेल. छायानाट सारख्या सांस्कृतिक केंद्रावर झालेला हल्ला हा आपल्या संस्कृतीवर झालेला आघात आहे."
शिराज अली खान हे उस्ताद ध्यानेश खान यांचे सुपुत्र आणि जगप्रसिद्ध उस्ताद अली अकबर खान यांचे नातू आहेत. त्यांचे कुटुंब कोलकात्यात स्थायिक असले तरी त्यांचे नाते बांगलादेशाशी आहे. त्यांचे पणजोबा उस्ताद अलाउद्दीन खान हे मूळचे बांगलादेशातील ब्राह्मणबारिया येथील होते. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती अत्यंत स्फोटक असून तिथे अल्पसंख्याकांवर आणि सांस्कृतिक केंद्रांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत एका भारतीय कलाकाराला आपला जीव वाचवण्यासाठी ओळख लपवावी लागली, ही घटना अत्यंत धक्कादायक घटना म्हणता येईल.